नागपूरच्या महापौर -उपमहापौरांना तीन महिने मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 22:06 IST2019-08-13T22:05:19+5:302019-08-13T22:06:27+5:30
राज्यातील महापौर आणि उपमहापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नागपूरच्या महापौर -उपमहापौरांना तीन महिने मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील महापौर आणि उपमहापौर निवडणुकींना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने महापौर नंदा जिचकार व उपमहापौर दीपराज पार्डीकर यांना मुदतवाढ मिळणार आहे. महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या ८ सप्टेंबर रोजी संपणार होता. परंतु, आजच्या या निर्णयामुळे महापौरांना ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापौरांची निवड केली जाणार आहे. शासन निर्णयामुळे महापौर व उपमहापौरांना जादा संधी मिळणार आहे.
शासनाचा निर्णय स्वागतार्ह- महापौर
राज्य सरकारने महापौर व उपमहापौरांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे दोन अडीच महिन्याचा कालावधी तसाच गेला. विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा काही महिने काम करता येणार नाही. मुदतवाढीमुळे विकास कामाला गती देता येईल. महिला उद्योजिकांसाठी प्रकल्प राबविण्याचे काम अपूर्ण आहे. मुदतवाढीमुळे हा प्रकल्प पूर्ण करता येईल. यासाठी मुदवाढीची शासनाकडे मागणी केली होती. शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. तसेच नासुप्र बरखास्त केल्याने आता महापालिके ला शहरातील अनधिकृत ले-आऊ ट भागात विकास कामे करता येईल. शहर विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.