मेयोत चौकशी समिती स्थापन
By Admin | Updated: July 7, 2015 02:25 IST2015-07-07T02:25:48+5:302015-07-07T02:25:48+5:30
उपराजधानीत ‘गर्भाशयाचा सौदा’ होत असल्याच्या खुलाशानंतर सोमवारी पोलीस व प्रशासन चांगलेच हादरले

मेयोत चौकशी समिती स्थापन
नागपूर : उपराजधानीत ‘गर्भाशयाचा सौदा’ होत असल्याच्या खुलाशानंतर सोमवारी पोलीस व प्रशासन चांगलेच हादरले. मेयो रुग्णालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तडकाफडकी एक समिती स्थापन केली. तसेच पीडित महिलेच्या सुरक्षेसाठी दोन महिला व सुरक्षा कर्मचारी तैनात केले. आर्थिक टंचाईमुळे एका महिलेने २५ हजार रु पयांत बाळाचा सौदा केल्याची माहिती पुढे आली होती. यासाठी पारडी येथील सोनू नावाच्या युवकाने त्या महिलेला तयार केले होते. त्याने पीडित महिलेची लक्ष्मी व किरण नावाच्या महिलांशी भेट करू न दिली होती. त्या दोघींनी आपल्या कथित बहिणीसाठी बाळाची खरेदी करायची असल्याचे सांगितले होते. यानंतर पीडित महिला सुमारे तीन महिने त्यांच्याजवळ राहिली. शिवाय गत सहा दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र तिने मुलाला जन्म देताच लक्ष्मी, किरण व सोनू यांच्यात भांडण सुरू झाले. तिघेही त्या बाळाला घेऊन जाण्यासाठी आपसात भांडू लागले. परंतु पीडित महिला बाळाला देण्यास तयार नव्हती. दरम्यान, ‘लोकमत’ने या टोळीचा भंडाफोड करताच पोलीस व मेयो प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर मेयो रुग्णालयाने पीडित महिलेची सुरक्षा वाढवून तिला पेर्इंग वॉर्डमध्ये ठेवले. यावेळी त्याच वॉर्डात इतर चार महिला रुग्णांनाही ठेवण्यात आले होते. परंतु सोमवारी त्या चार महिलांना तेथून हलविण्यात आले. यानंतर चौकशी समिती व तहसील पोलिसांनी त्या पीडित महिलेची चौकशी केली. दरम्यान, महिलेने संपूर्ण हकीकत सांगितली. तेव्हापासून पोलीस सोनू, लक्ष्मी व किरण यांचा शोध घेत आहेत. पीडित महिलेजवळ मोबाईल फोन नाही. त्यामुळे तिच्याकडे कुणाचा नंबरसुद्धा नाही. मात्र तिने संबंधित परिसरात गेल्यानंतर तिला ठेवण्यात आलेल्या घराची ओळख सांगता येईल, असे सांगितले.
दुसरीकडे मेयो रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पीडित महिलेच्या कक्षात डॉक्टरांशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना येथे येणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचीही पोलखोल झाली आहे. येथील पेर्इंग वॉर्डाशेजारीच सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय आहे. शनिवारी येथे बाळाच्या खरेदीवरू न सोनू, लक्ष्मी व किरण यांच्यात भांडण झाले. परंतु त्याची कुणालाही भनकसुद्धा लागली नाही.
मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.(प्रतिनिधी)
चेहऱ्यावर हास्य
‘लोकमत’ने या प्रकरणाचा खुलासा करताच पीडित महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य परत आले आहे. ती आता आपल्या बाळाला सोबत घेऊन जाऊ शकते, असा तिला विश्वास आला आहे. आर्थिक टंचाईमुळे सोनूच्या जाळ्यात अडकल्याचे तिने मान्य केले.
डॉक्टरांचा सल्ला
गर्भाशयाच्या सौद्याची खरी कहाणी पुढे येताच मेयो रुग्णालयातील डॉक्टरांनी महिला रुग्णांना शांत राहण्याचा सल्ला दिला. या प्रकरणामुळे प्रशासन हादरले आहे. प्रशासनाला प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यावे लागत आहे.