मेयोच्या अधिष्ठात्यांना लाच घेताना अटक
By Admin | Updated: January 17, 2017 01:43 IST2017-01-17T01:43:09+5:302017-01-17T01:43:09+5:30
औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ...

मेयोच्या अधिष्ठात्यांना लाच घेताना अटक
औषध पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच १५ हजार स्वीकारताना पकडले वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
नागपूर : औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) लाचखोर महिला अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणेला साथीदारासह सोमवारी अटक करण्यात आली. विजय मिश्रा (४४) असे अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव असून तो एनआरएच वसतिगृहात खासगी मेस चालवतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.
तक्रारकर्ता हा औषध विक्रेता आहे. नागपुरात त्याचे औषधीचे दुकान आहे. जुलै-२०१५ मध्ये मेयो रुग्णालयाच्या वतीने अधिष्ठात्यांनी औषध पुरवठा करण्याबाबत निविदा काढली होती. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने निविदा भरली. निविदेअंतर्गत तक्रारकर्त्याने डिसेंबर-२०१६ हिवाळी अधिवेशनात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधी पुरवठा केला. या औषधांची एकूण किंमत २ लाख ९४ हजार ६६० रुपये इतकी होती. हे बिल त्यांनी २८ डिसेंबर २०१६ रोजी मेयो रुग्णालयातील कार्यालयात मंजुरीसाठी सादर केले. परंतु ते बिल मंजूर झाले नाही. अखेर तक्रारकर्ते हे या बिलाच्या मंजुरीसंदर्भात अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणे यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्यास ही लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कार्यालयात गेल्या १० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर व गोंदिया येथे पडताळणी केली. अखेर सोमवारी सापळा रचण्यात आला. डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणेला विजय मिश्रा याच्यामार्फत लाचेचे १५ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. विजय मिश्रा हा बाबुळखेडा येथे राहतो. तो एनआरएच हॉस्टेल येथे खासगी मेस चालवतो.
ही कारवाई एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस शिपाई रणजित बिसेन, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदन बिसेन, दवानंद मारबते, मोनाली चौधरी, गजानन गाडगे, पल्लवी बोबडे आदींनी केली. (प्रतिनिधी)
‘सिस्टीम’चा फटका बसल्याची चर्चा
मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणे यांच्यावरील कारवाई ही ‘सिस्टीम’चा फटका असल्याची चर्चा आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबईहून अनेक अधिकारी नागपुरात येतात. त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची जबाबदारी मेडिकल व मेयोला घ्यावी लागते. यावर्षी २५ अधिकारी आले होते. त्यांच्यासाठी सकाळच्या जेवणाची सोय मेयोने तर सायंकाळच्या जेवणाची सोय मेडिकलने केली होती. मेयोकडून सकाळच्या जेवणाचे २५ डबे मेयो वसतिगृहातील खासगी मेसमधून पाठविले जात होते. १५ दिवस एकवेळच्या जेवणाचा खर्च सुमारे ५० हजाराच्या घरात गेला होता. मेस संचालक पैशासाठी अधिष्ठात्यांना त्रास द्यायचा यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.