परिचारिकेने प्रसंगावधान दाखवून नऊ बालकांना तातडीने दुसऱ्या जवळच्या खोलीत हलविले, आणखी दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर अघटित घडले असते.
मेयोत आग : नऊ नवजात बालकांचे वाचले प्राण
ठळक मुद्दे परिचारिकेचे धाडस : डॉक्टरांनी तातडीने सुरू केले उपचार
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील ‘प्री टर्म बेबी युनिट’ मध्ये (पीबीयू) ३१ ऑगस्टच्या रात्री २.४५ वाजताच्या सुमारास ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. त्यावेळी या कक्षात नऊ नवजात बालके उपचार घेत होती. कर्तव्यावर असलेल्या सविता ईखार या परिचारिकेने प्रसंगावधान दाखवून नऊ बालकांना तातडीने दुसऱ्या जवळच्या खोलीत हलविले, आणखी दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर अघटित घडले असते.मेयो रुग्णालय ३८.२६ एकरमध्ये पसरलेले आहे. या रुग्णालयात आजही काही अशा इमारती आहेत ज्यांचे वय शंभरीच्या पुढे गेले आहे. यातीलच एका इमारतीत स्त्री रोग व प्रसूती विभाग आहे. या विभागात आजही जुन्याच पद्धतीची विद्युत व्यवस्था आहे. जुनाट व कालबाह्य झालेल्या या व्यवस्थेमुळे या पूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या २० क्रमांकाच्या वॉर्डासमोर बालरोग विभागांतर्गत येणारा ‘पीबीयू’ हा कक्ष आहे. सहा खाटांचा हा कक्ष असताना नऊ नवजात बालकांना ठेवण्यात आले होते. पाच बालकांची प्रकृती गंभीर होती. यातील तिघांना ऑक्सीजनवर तर दोघांना ‘वॉर्मर’वर ठेवण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सक्रिट होऊन धूर पसरून आग आगली. यावेळी कर्तव्यावर असलेली सविता ईखार या स्टाफ नर्सने तातडीने याची माहिती सुरक्षा रक्षकांना दिली. ‘इलेक्ट्रीशियन’ला आणि बालकांच्या आईंना बोलविण्यास सांगितले. परंतु त्यांना यायला व मदत पोहचण्यास उशीर होणार होता, धूर आणि आग वाढत असल्याने परिचारिका ईखार दोन हातात दोन-दोन बालके घेऊन कक्षाबाहेर पडल्या. समोर स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या शस्त्रक्रिया गृहाला लागून डॉक्टरांची खोली आहे. तेथील खाटेवर चार बालकांना ठेवले. त्याचवेळी तिच्या मदतीला दुसरी परिचारिका धावली. त्या बालकाजवळ थांबल्या. ईखार धावत जाऊन पुन्हा त्या धुराने भरलेल्या कक्षात गेल्या. आग पसरू नये म्हणून तातडीने ऑक्सीजन आणि वॉर्मर बंद केले. त्यातील तीन बालकांना हातात घेतले, त्याचवेळी इतरही जणांनी धाव घेतली. त्यांनी इतर बालकांना हातात घेऊन खोलीत आणले. याचदरम्यान बालरोग विभागाचे डॉ. दीपक मडावी, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र लाडे, इंटर्न डॉ. अंकिता मोहोड, डॉ. सौरभ व स्त्री रोग विभागाचे डॉ. शुभम वर्मा यांनी तातडीने बालकांची तपासणी केली. जे बालके ऑक्सिजनवर होती त्यांना ऑक्सिजन लावले. परिचारिका ईखार यांनी धाडस दाखविल्याने व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कमी वेळेत बालकांवर उपचार सुरू केल्याने नऊही बालकांचे प्राण वाचले. सध्या या बालकांवर वॉर्ड क्रमांक २, ३ व ८ मध्ये उपचार सुरू असून सर्वच बालके धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. १९९८ घटनेची पुनरावृत्ती १९९८ मध्ये बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागाला ‘शॉर्ट सक्रिट’मुळे आग लागली होती. त्यावेळी ‘विद्या चंद्रशेखर कावळे’ या परिचारिकेने कक्षातील सातही बाळांना आपल्या पदरात घेऊन सुरक्षित स्थळ गाठले होते. त्या परिचारिकेच्या हिमतीची दाद आजही दिली जाते. ‘लोकमत’ने बालरोग विभाग धोक्यात असल्याकडे वेधले होते लक्ष २२ एप्रिल २०१९ रोजी अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाला अचानक आग लागल्याने नवजात बालकांचे प्राण धोक्यात आले होते. या घटनेला घेऊन ‘लोकमत’ने मेयोच्या बालरोग विभागाची पाहणी केली होती. विभागाच्या इमारतीत व वॉर्डात अग्निशमन उपकरणेच नसल्याचे, शिवाय दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘एनआयसीयू’ वॉर्डात येण्या-जाण्यासाठी अरुंद पायऱ्या असल्याने आगीची घटना घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली होती. ‘मेयोचा बालरोग विभाग धोक्यात’ या मथळ्याखाली हे वृत्त प्रसिद्ध केले होते.