Mayo: Closing surgery home finally started | मेयो : अखेर बंद शस्त्रक्रिया गृह सुरू
मेयो : अखेर बंद शस्त्रक्रिया गृह सुरू

ठळक मुद्देचार विभागाच्या शस्त्रक्रियागृहाला लागले होते फंगस


लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चार महत्त्वाच्या विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना बुरशी (फंगस) लागल्याने जून महिन्यापासून त्या बंद पडल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याला गंभीरतेने घेत बांधकाम विभागाला याविषयी जाब विचारल्याने यंत्रणा हलली. शस्त्रक्रियागृहात नवी यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे नुकतीच शल्यचिकित्सा व अस्थिव्यंगोपचार विभागाचे शस्त्रक्रियागृह सुरू झाले. मंगळवारपासून नेत्ररोग विभागाचे तर पुढील आठवड्यात ईएनटी विभागाचे शस्त्रक्रियागृह सुरू होणार आहे.
मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये ऑर्थाेपेडीक, ईएनटी, सर्जरी व नेत्ररोग विभागाच्या प्रत्येक तीन-तीन शस्त्रक्रियागृह आहेत. जून महिन्यात ऑर्थाेपेडीक विभागाच्या शस्त्रक्रिया गृहाला फंगस लागले. याच दरम्यान नेत्ररोग, ईएनटी व सर्जरी विभागाच्या शस्त्रक्रियागृहालाही फंगस लागले. चारही विभागाच्या शस्त्रक्रिया प्रभावित झाल्याने रुग्ण अडचणीत आले होते. सर्जरी विभाग मॉड्युलर शस्त्रक्रिया गृहात शस्त्रक्रिया करीत असले तरी रोज दोन किरकोळ आणि गंभीर स्वरूपातील एकच शस्त्रक्रिया होत होत्या. ऑर्थाे विभागाने आपली तात्पुरती सोय केली होती. परंतु रुग्ण संख्येच्या तुलनेत मर्यादितच शस्त्रक्रिया होत होत्या. ईएनटी विभागाचेही असेच चित्र होते. नेत्ररोग विभागावर तर रुग्णांना डागा रुग्णालयात नेऊन तिथे शस्त्रक्रिया करावी लागत होती. शस्त्रक्रियागृहांना फंगस लागण्यामागे ‘एअर हॅण्डलिंग युनिट’ कारणीभूत होते.‘मॉश्चर’ तयार होऊन बुरशी लागत असल्याचे समोर आले होते. परंतु बांधकाम विभागाने सुरुवातीला त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरताच संचालक डॉ. लहाने यांनी १२ सप्टेंबर रोजी मेयोला भेट दिली. तातडीने शस्त्रक्रियागृह सुरू करण्याचा सूचनाही दिल्या. यामुळे यंत्रणा हलली. ‘हेफा फिल्टर’ ‘मायक्रो फिल्टर’ बदलवून नवी यंत्राणा बसविण्यात आली. यामुळे गेल्याच आठवड्यात सर्जरी व ऑर्थाेपेडीक विभागाचे शस्त्रक्रिया गृह सुरू झाले. पुढील आठवड्यात उर्वरित दोन विभागाचे शस्त्रक्रियागृह सुरू होणार आहे.

मंगळवारपासून नेत्र शस्त्रक्रियांनाही सुरुवात
‘फंगस’ लागल्याने नेत्रच्या शस्त्रक्रिया डागा रुग्णालयात केल्या जात होत्या. आता शस्त्रक्रियागृहातील समस्या दूर झाली आहे. मंगळवार २६ नोव्हेंबरपासून नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहातच सुरुवात होईल. ऑर्थाेपेडीक व सर्जरीच्या शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे, तर पुढील आठवड्यात ईएनटी विभागाची शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत.
डॉ. रवी चव्हाण
वैद्यकीय उपअधीक्षक, मेयो

Web Title: Mayo: Closing surgery home finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.