माथेफिरूने रेल्वेसमोरच उडी घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:32+5:302020-12-12T04:26:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेमभंग झालेल्या आरोपीने तरुणीचा लहान भाऊ आणि तिच्या आजीची हत्या केल्यानंतर रात्री स्वतःला रेल्वेखाली ...

माथेफिरूने रेल्वेसमोरच उडी घेतली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमभंग झालेल्या आरोपीने तरुणीचा लहान भाऊ आणि तिच्या आजीची हत्या केल्यानंतर रात्री स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. यामुळे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या गिट्टीखदानच्या दुहेरी हत्याकांडाला वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपी केवळ १७ वर्षांचा असून त्याने गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास गिट्टीखदानमधील हजारी पहाड, क्रिष्णानगरात राहणाऱ्या लक्ष्मीबाई उर्फ प्रमिला मारोती धुर्वे (वय ७०) तसेच त्यांचा १० वर्षीय नातू यश मोहन धुर्वे या दोघांची निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली. आरोपीचे धुर्वे परिवारातील तरुणी (वय २०) सोबत प्रेमसंबंध होते. इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर अरबू नामक मित्राला दूर सारत आरोपीने तरुणीसोबत सलगी वाढवली होती. तो नेहमी तिच्या घरी जात होता. वडिलांसोबत फेेब्रिकेशनच्या दुकानात काम करणारा आरोपी प्रेमाच्या नावाखाली कमालीचा निर्ढावलेपणा दाखवत होता. त्याने गेल्या आठवड्यात तरुणीला मारहाणही केली होती. त्यामुळे तरुणीसोबत तिचे कुटुंबीयही दहशतीत आले होते. त्यांनी तिला दुसरीकडे ठेवले होते. मोबाईलही बंद केला होता. ती दुरावल्याची भावना झाल्याने आरोपीचे डोके फिरले होते. या पार्श्वभूमीवर, या माथेफिरूने तरुणीच्या आजीसोबतच तिच्या निरागस भावाचीही निर्घृण हत्या केली. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपीची शोधाशोध करू लागले.
मित्राला फोन केला
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने दुपारी ४ च्या सुमारास एका मित्राला फोन करून पैसे मागितले. मित्राने त्याला आपल्याकडे पैसे नाही, असे सांगून पोलिसांसमोर आत्मसमर्पण कर, असा सल्ला दिला. मात्र, आपण आत्मसमर्पण करणार नाही तर आत्महत्या करणार आहे, असे आरोपी म्हणाला. दरम्यान, त्याने मित्रांना फोन केले होते. त्यांना पोलिसांनी विचारपूस करून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपी पोलिसांच्या हाती जिवंत लागू शकला नाही.
---
असा लागला पत्ता
रात्रीच्या वेळेस रेल्वे इंजिन ड्रायव्हरने रेल्वे कंट्रोल रूममध्ये फोन करून एकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती दिली. ती माहिती मिळाल्यानंतर मानकापूर पोलीस घटनास्थळी पोचले. ते मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच आरोपीच्या मित्रांनी तो आत्महत्या करीत असल्याची निरोपवजा माहिती गिट्टीखदान पोलिसांना दिली. त्यानुसार गिट्टीखदान पोलीसही मानकापुरातील रेल्वे पटरीवर पोहोचले. तोवर वृद्ध लक्ष्मीबाई आणि निरागस यशची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचा धडधडत्या रेल्वेने हिशेब केला होता. रेल्वेखाली आत्महत्या करणारा दुहेरी हत्याकांडाचा आरोपीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत रवाना केला.
---
चौकशीची औपचारिकता
आरोपीने आत्महत्या केल्याने या दुहेरी हत्याकांडाला वेगळे वळण मिळाले आहे. चौकशीची केवळ कागदोपत्री पूर्तता करणे एवढेच काम पोलिसांसमोर आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी अहवाल अद्याप समोर आला नाही.
या प्रकरणाशी जुळलेल्या दुसऱ्या पैलूंची पोलीस चौकशी करीत आहेत.
---