कोरोना काळात माता मृत्यूच्या प्रमाणात ७३ टक्क्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST2021-02-09T04:11:18+5:302021-02-09T04:11:18+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोना काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असताना दिलासा देणारी बातमी सामोर आली आहे. पूर्वविदर्भात २०१९च्या ...

कोरोना काळात माता मृत्यूच्या प्रमाणात ७३ टक्क्याने घट
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असताना दिलासा देणारी बातमी सामोर आली आहे. पूर्वविदर्भात २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये मातामृत्यूचे प्रमाण ७३ टक्क्याने कमी झाले. मागील वर्षी १८७, तर त्यापूर्वी २५५ मातामृत्यूची नोंद होती. मात्र, सहा जिल्ह्यांपैकी भंडारा, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यांत मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात १९९०मध्ये एक लाखांमागे ५५६ माता मृत्युदर होता. नुकत्याच झालेल्या ‘सॅम्पल सर्व्हे रजिस्ट्रेशन सर्व्हे’नुसार (एसआरएस) मागील तीन वर्षांत राज्यात माता मृत्युदर ६८ वरून ६१ नंतर ५५ आणि आता ४६ असा नोंदविण्यात आला आहे. यात पहिल्या क्रमांकावर केरळ (४३), महाराष्ट्र (४६), तामिळनाडू (६०), तेलंगाणा (६३), तर आंध्र प्रदेश (७४) राज्यांचा समावेश आहे. अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्च रक्तदाब, अॅनिमिया ही मातामृत्यूची मुख्य कारणे आहेत. यात ३८ टक्के मृत्यू प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे (पोस्टमार्टम हेमरेज) होतात. हे मृत्यू थांबविण्यास आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागपूर व वर्धा जिल्हा वगळता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील माता मृत्यूचे ‘ऑडिट’ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
- नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी १०२ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल व डागा रुग्णलयात केवळ विदर्भच नाही तर शेजारच्या राज्यातील माता प्रसूतीसाठी येतात. यामुळे जिल्ह्यात माता मृत्यूचा दर इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असतो. २०१९ मध्ये माता मृत्यूची संख्या १७८ असताना २०२० मध्ये १०२ वर आली. वर्धा जिल्ह्यात २०१९ मध्ये २९ असलेली माता मृत्यूची संख्या २०२० मध्ये कमी होऊन १६ झाली. परंतु भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये माता मृत्यूची संख्या ७ असताना २०२० मध्ये ती वाढून ११वर गेली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये ९ वरून २०२०मध्ये १३, गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये १४ असताना २०२० मध्ये १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये २९ असताना २०२० मध्ये माता मृत्यूची संख्या ३० झाली.
- मृत्यूचे ऑडिट व त्यावरील उपाययोजनांची गरज
गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात माता मृत्यूच्या अनेक कारणांमध्ये अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब, अॅनिमिया हे मुख्य कारण असल्याचे विविध प्रकरणांतून सामोर आले आहे. अलीकडे शासनाने प्रसूती मातांसाठी ‘ट्रान्सपोर्ट’ची विशेष व्यवस्था केली असली तरी मातांकडूनच रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मातामृत्यूचे ‘ऑडिट’ होणे व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ
-दोन वर्षांतील मातामृत्यू
जिल्हा २०१९ २०२०
नागपूर १७८ १०२
भंडारा७ ११
गडचिरोली९ १३
गोंदिया १४ १५
चंद्रपूर १९ ३०
वर्धा २९ १६