अस्थिकलशची भव्य मिरवणूक : हजारो नागरिकांनी घेतले दर्शन
By Admin | Updated: October 15, 2015 03:21 IST2015-10-15T03:21:27+5:302015-10-15T03:21:27+5:30
तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे साक्षात दर्शन झाल्याने नागपूरकर धन्य झाले आहेत.

अस्थिकलशची भव्य मिरवणूक : हजारो नागरिकांनी घेतले दर्शन
नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे साक्षात दर्शन झाल्याने नागपूरकर धन्य झाले आहेत. २५०० वर्षांपासून जतन करून ठेवलेला हा अस्थिकलश श्रीलंकेवरून नागपूरकरांच्या दर्शनासाठी बुधवारी आणण्यात आला होता. शहरातून या अस्थिकलशाची भव्य मिरवणूक काढल्यानंतर बेझनबाग मैदानात तो नागरिकांसाठी दिवसभर दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी बौद्ध समाजबांधवांसह हजारो नागरिकांनी या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, बुद्धिस्ट स्पिरिच्युअल पार्क आणि बुद्धिस्ट फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाने जतन करून ठेवलेला तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश भारतात आणण्यात आला. बुधवारी मुंबईहून तो विमानाने नागपूरच्या विमानतळावर आणण्यात आला. यावेळी हजारो नागरिक विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित होते. विमानतळावर अस्थिकलशाचे स्वागत केल्यानंतर विमानतळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर एका भव्य रथावर अस्थिकलश ठेवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. विमानतळावरून अस्थिकलशाचा रथ थेट संविधान चौकात पोहोचला. या ठिकाणी हजारो नागरिकांनी अस्थिकलशाचे स्वागत करून दर्शन घेतले. येथून गिट्टीखदान चौक, बोरगाव चौक, जाफरनगर, पागलखाना चौक, कडबी चौक मार्गे हा रथ बेझनबाग येथील मैदानात पोहोचला. दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी अस्थिकलशाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले होते. प्रत्येक चौकात अस्थिकलशाचे स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने नागरिक अस्थिकलशाच्या दर्शनासाठी उभे होते. युवा भीम मैत्री संघाच्यावतीने बेझनबाग मैदानात भव्य स्टेज उभारण्यात आला होता. यावर तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सायंकाळपर्यंत बौद्ध समाजबंधवांसह हजारो नागरिकांनी या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)
महापौरांनी केले अस्थिकलशाचे स्वागत
बुधवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे आगमन झाले. या अस्थि श्रीलंकेवरून मुंबईला आणि मुंबईवरून त्या विमानाने नागपुरात आल्या. महापौर प्रवीण दटके यांनी श्रीलंकेच्या शिष्टमंडळासह तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाला पुष्पहार अर्पण करून शहरवासीयांतर्फे स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. रामदास आठवले, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आ. प्रकाश गजभिये, डॉ. मिलिंद माने, नगरसेवक संजय बोंडे, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, शहराध्यक्ष भीमराव फुसे, मनोहर दुपारे, शंकरराव ढेंगरे, राजू बहादुरे, अशोक कोल्हटकर, डॉ. मिलिंद जीवने, मनोज सांगोळे उपस्थित होते. विमानतळावरून काढण्यात आलेल्या अस्थिच्या मिरवणुकीतही महापौर सहभागी झाले होते.
हिरेजडित सुवर्ण अस्थिकलश
श्रीलंकेतील राजगुरुजी सुभूती महाविहार येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी ज्या कलशात जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत, तो हिरेजडित सुवर्ण कलश आहे. संपूर्ण कलशाचे जवळपास १५ किलो वजन आहे. या अस्थिकलशासह श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू संघासह ३० प्रतिनिधीसुद्धा आले आहेत.
रात्रभर चालले महापरित्राणपाठ
बेझनबाग मैदानात बुधवारी सायंकाळी ७ वाजता महापरित्राण पाठ आयोजित करण्यात आला. भदंत ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात भिक्षू संघ उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ५ वाजेपर्यंत परित्राण पाठ सुरू होते. भदंत ज्ञानज्योती यांनी यावेळी धम्म प्रवचन दिले. यावेळी नागपूरकरंसह राजकोट, राजस्थान, मुंबई, पुणे, सावनेर, भंडारा, काटोल आदी भागातूनही अनुयायी उपस्थित होते. भीम मैत्रिय संघातर्फे जितेंद्र बन्सोड़, निशांत नांदगांवे, संघपाल उपरे, हितेश उके, दीपक वासे, अजय चव्हाण, विवेक निकोसे, विनोद वाल्दे आदींनी परिश्रम घेतले.