मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार

By Admin | Updated: May 22, 2015 02:33 IST2015-05-22T02:33:59+5:302015-05-22T02:33:59+5:30

मतिमंद मुलीला धाक दाखवून, मारहाण करून वसतिगृहातील दोन नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

Mass tortured on a minded girl | मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार

मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार

वसतिगृहातील नराधमांचे कुकृत्य : मुलीला गर्भधारणा
नागपूर : मतिमंद मुलीला धाक दाखवून, मारहाण करून वसतिगृहातील दोन नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या घृणित कृत्याची मोबाईलवरून ‘क्लिप’ही बनविली. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. तिच्या घरची स्थिती हलाखीची असल्यामुळे तिच्या आईने तिला चार वर्षांपूर्वी प्रतापनगर चौकातील बालविकास अपंग शाळेच्या वसतिगृहात घातले. यंदा तिने दहावीची परीक्षा दिली.
पाच महिन्यांपूर्वी एक दिवस ती नैसर्गिक विधीला गेली असताना आरोपी वसतिगृहाचा गार्ड किसन बावणे (वय ५७) याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तो हे कुकृत्य करताना स्वयंपाकी भरत कांबळी (वय ४४) याने पाहिले. त्याने हा अत्याचार उघड करण्याऐवजी तो सुद्धा पापाचा भागीदार बनला. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. नंतर हे नराधम तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करू लागले. कळस म्हणजे एक नराधम अत्याचार करीत असताना दुसऱ्याने मोबाईलवरून त्याची क्लिप तयार केली. मुलीने संबंधाला नकार दिल्यास ही क्लिप दाखवून बदनामी करण्याचा धाक दाखवून तर कधी मारहाण करून ते तिचे लैंगिक शोषण करीत होते. चार महिन्यांपासून सातत्याने शरीरसंबंध प्रस्थापित होत असल्यामुळे मुलीला गर्भधारणा झाली. दरम्यान, शाळेला सुटी लागल्यामुळे मुलीच्या आईने तिला घरी नेले. ती सारखी ओकारी करीत असल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने पीडित मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या आईने मुलीला विचारणा केली. हा घृणित प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या आईने बुधवारी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सामूहिक अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)
रक्षक बनला भक्षक : ‘रक्षकच भक्षक बनला’ या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या या घटनेतील दोन्ही नराधमांच्या एपीआय प्रशांत नागटिळक यांनी गुरुवारी मुसक्या बांधल्या. त्यांचे मोबाईलही जप्त केले. या वसतिगृहात आणखी अनेक मतिमंद मुली आहेत. त्यांच्यापैकी आणखी काही जणींसोबत या नराधमांनी असेच केले की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. शाळेला सुटी लागल्यामुळे त्या आपापल्या घरी गेल्या आहेत. मतिमंद असल्याने त्यांना या अत्याचाराची जाणीव नाही. उघडकीस आलेल्या या घटनेने ‘संभाव्य धोक्याचे’ संकेत मिळाले असून, एक मोठे प्रकरणच बाहेर येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Mass tortured on a minded girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.