शहीद जवान मंगेशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:37+5:302021-03-07T04:08:37+5:30

भिवापूर : छत्तीसगडमधील कोहकामेटा परिसरातील जंगलात कोंबिंगदरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपीचा) जवान व भिवापूरचा ...

Martyr Jawan Mangesh was cremated in a state funeral | शहीद जवान मंगेशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान मंगेशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भिवापूर : छत्तीसगडमधील कोहकामेटा परिसरातील जंगलात कोंबिंगदरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात इंडो तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपीचा) जवान व भिवापूरचा सुपुत्र मंगेश हरिदास रामटेके (४०) शहीद झाला. त्याच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास भिवापूर येथे मोक्षधामावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातून मोठा जनसागर सहभागी झाला होता. एक निर्भीड सुपुत्र गमविल्याचे दु:ख असलेले भिवापूरकर नि:शब्द होते. मात्र घोषणांच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश कायम होता. पत्नी राजश्री, वडील हरिदास, आई विजया, धाकटा भाऊ दिनेश यांचे अश्रू मात्र थांबत नव्हते.

भिवापूर सिद्धार्थनगर येथील मंगेश हरिदास रामटेके (४०) हा इंडो तिबेट बॉर्डरचा जवान शुक्रवारी सहकाऱ्यांसह छत्तीसगडमधील कोहकामेटा जंगलात कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना नक्षलवाद्यांच्या भूसुरूंग स्फोटात शहीद झाला. सायंकाळी घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांना जबर धक्का बसला. भिवापूरकर हळहळले. सकाळपासून हजारोच्या संख्येतील प्रत्येकाची पावले शहीद मंगेशच्या घराकडे मार्गक्रमण करू लागली. शनिवारी सकाळी शहीद मंगेशचे पार्थिव घेऊन छत्तीसगड येथून निघालेला आयटीबीपीचा ताफा सायंकाळी ४.३० च्या सुमारास भिवापूर येथे पोहोचला. ‘शहीद मंगेश अमर रहे, वंदेमातरम्‌, भारत माता की जय’च्या घोषणांनी यावेळी आसमंत निनादला. अंत्यदर्शनासाठी मंगेशचे पार्थिव त्याच्या घरी ठेवण्यात आले. काही काळानंतर अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून मरूनदी मोक्षधामावर येऊन शासकीय इतमामात शहीद मंगेशवर अंत्यसंकार करण्यात आले.

यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. राजू पारवे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, उमरेडचे उपविभागीय अधिकारी सावंत कुमार, माजी आ. सुधीर पारवे, राजू राऊत, संदीप इटकेलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर, यशवंत सोलसे, खंडविकास अधिकारी माणिक हिमाने, जि. प. सदस्य शंकर डडमल, संदीप निंबार्ते, माजी नगराध्यक्ष किरण नागरिकर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या दुख:द घटनेनंतर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Martyr Jawan Mangesh was cremated in a state funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.