विवाहितेची आत्महत्या सासरच्या चौघांना कारावास
By Admin | Updated: July 4, 2015 03:11 IST2015-07-04T03:11:35+5:302015-07-04T03:11:35+5:30
हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून एका गरोदर विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून अतिरिक्त

विवाहितेची आत्महत्या सासरच्या चौघांना कारावास
नागपूर : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून एका गरोदर विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक यांच्या न्यायालयाने सासरच्या चार जणांना दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पती उदय अरुणराव नलगे (३२), नणंद प्रणाली अरुण नलगे (३१), सासू मंदा अरुण नलगे (५९) आणि सासरे अरुण नारायण नलगे (६०), अशी आरोपींची नावे असून ते सक्करदरा आनंदनगर येथील रहिवासी आहेत. अश्विनी उदय नलगे, असे मृत विवाहितेचे नाव होते.
बैतुल येथील चंदा दिवाकर शिंदे यांची मुलगी अश्विनी हिचे लग्न २०११ मध्ये उदय नलगे याच्यासोबत झाले होते. लग्नात ३० हजार रुपये हुंडा देण्यात आला होता. संसाराला लागताच पुन्हा हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता.
तिला जेवण न देता सतत मारहाण केली जात होती. छळाला कंटाळून तिने १० आॅगस्ट २०१२ रोजी ओढणीने छताला बांधून गळफास लावून आत्महत्या केली होती. आई चंदा शिंदे यांच्या तक्रारीवरून २७ आॅगस्ट २०१२ रोजी भादंविच्या ४९८-अ, ३०६, ३०४-ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात केवळ मानसिक व शारीरिक छळाचा गुन्हा सिद्ध झाला. उर्वरित दोन गुन्हे सिद्ध करण्यास सरकार पक्षाला अपयश आले. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत, अजय माहूरकर तर आरोपींच्यावतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)