नागपुरात बाजारपेठा बंद, वीकेंड लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:18+5:302021-04-12T04:07:18+5:30
नागपूर : कोरोनाची साखळी आणि संसर्गावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी ...

नागपुरात बाजारपेठा बंद, वीकेंड लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी
नागपूर : कोरोनाची साखळी आणि संसर्गावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी शहरातील किराणा दुकाने आणि फार्मसी वगळता सर्व ठोक बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. पेट्रोलपंप आणि दूध डेअरी सुरू होती. खासगी कार्यालये बंद होती. लॉकडाऊनचा परिणाम सर्वत्र दिसत होता. रस्त्यावर तुरळक वाहने दिसून आली. रस्त्यावर मनपाच्या बसेस दिसल्या नाहीत. चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त होता. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. वीकेंड लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले.
महाल, इतवारी, मस्कासाथ, गांधीबाग, सीताबर्डी, खामला, जरीपटका, सक्करदरा, कमाल चौक येथील बाजारपेठा पूर्णत: बंद होत्या. शनिवारप्रमाणे रविवारी व्यापारी बाजारपेठांमध्ये दिसले नाहीत. रुग्णालयात भरती होऊन लाखो रुपये खर्च करण्याऐवजी लॉकडाऊन केव्हाही बरा, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली, तर काही व्यापाऱ्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून वेळेच्या मर्यादेत दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे मत व्यक्त केले. कळमना येथील भाजीबाजार व कॉटन मार्केट बाजारपेठेत सकाळी ९ पर्यंत भाज्यांची खरेदी-विक्री झाली.
आवश्यक सेवा सुरू
वैद्यकीय कारणांनी आणि आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही लोक घराबाहेर पडल्याचे दिसून आले. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिल्याने बहुतांश नागरिक सकाळपासूनच घरातच होते, पण काही नागारिक गाड्यांनी अनावश्यक रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसले. जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढल्या असून त्या प्रमाणात रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारीही वाढली आहे. आवश्यक सेवा सुरू असल्याने लोकांची अडचण झाली नाही.
बाजारपेठा सुनसान
महाल, इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठांची पाहणी केली असता, या बाजारात व्यापारी वा नागरिक कुणीही दिसले नाहीत. सर्व बाजारपेठांमधील दुकाने पूर्णत: बंद होती. नंदनवन आणि महाल बाजारात काही किराणा दुकानेही बंद होती. याशिवाय फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांनी रविवारी दुकाने लावली नाहीत. व्यापारी म्हणाले, दुकानदारांवर बंधने आणली आहेत, तशीच बंधने नागरिकांवर असावीत. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी सांगितले.
जनजागृतीची गरज
कोरोना रुग्ण वाढत असताना नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, यावर जनजागृतीची गरज असल्याचे मत कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी व्यक्त केले. फिरणाऱ्या लोकांवर प्रशासनाने कारवाई करावी आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही चौकांत पोलिसांनी अनावश्यक फिरणाऱ्या युवकांना लाठीचा प्रसाद दिला आणि लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले. रस्त्यांवर फिरणाऱ्या आणि बाहेरगावांतून येणाऱ्या लोकांना पोलिसांनी विचारपूस करून परत पाठवित होते. बांधकाम स्थळावर जाणाऱ्या कामगारांना जाऊ देण्यात आले. सायंकाळी अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसले.
- किराणा, भाजीपाला, दूध आदींची दुकाने सुरू
- फार्मसी, पेट्रोलपंप आणि वैद्यकीय सेवा सुरू
- कॉटन मार्केट व कळमना भाजीबाजार सुरू
- सराफा, कापड व संबंधित दुकाने बंद