बाजारपेठा हाऊसफुल्ल

By Admin | Updated: November 10, 2015 03:28 IST2015-11-10T03:28:41+5:302015-11-10T03:28:41+5:30

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने-चांदीची जोरदार खरेदी केली. सोमवारी सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या.

Marketplace Housefull | बाजारपेठा हाऊसफुल्ल

बाजारपेठा हाऊसफुल्ल

धनत्रयोदशीला कोट्यवधींची उलाढाल : सोने खरेदीची धूम
नागपूर : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने-चांदीची जोरदार खरेदी केली. सोमवारी सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल होत्या. सराफा बाजारात सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दिवाळीत एकाच दिवशी सर्व बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली.
खरेदीचा उत्साह
ग्राहकांची खरेदीसाठीची लगबग आणि दुकादारांची धावपळ, असा माहोल होता. महाल, इतवारी, सीताबर्डी, सक्करदरा, खामला, सदर, जरीपटका या बाजारपेठांमध्ये सोन्याच्या विक्रीत २० टक्के वाढ आहे.
सोमवारी शुद्ध सोन्याचे प्रतितोळा दर २६,४२५ रुपये आणि एक किलो चांदीचे दर ३६,२०० रुपये होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव कमी होते. त्यामुळेच सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिवसागणिक वाढत असल्याचे धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दिवाळीच्या दिवशीही अशीच गर्दी राहील, अशी अपेक्षा सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी व्यक्त केली. ग्राहकांचा कल पाहून सराफांनी कमी वजनातील दागिन्यांची वैविध्यपूर्ण शृंखला बाजारात आणली आहे.


गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी
धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दागिन्यांना प्रचंड मागणी असते. या दिवशी दागिने खरेदी केले जातात, शिवाय गुंतवणूक म्हणूनही ग्राहक एक किंवा दोन ग्रॅम सोन्याची खरेदी करतात. सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुंतवणूकदार जास्त वजनातील वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने, शिवाय सोन्याची बिस्किटे व नाणी खरेदी करतात. सोन्याच्या एकूण विक्रीमध्ये नाणे विक्रीचेही मोठे योगदान आहे. पण सोमवारी कमी वजनातील दागिन्यांना मागणी होती. अनेकांनी आॅर्डर देऊन दागिने लक्ष्मीपूजनाला घरी नेण्याचे बेत आखले आहेत.

Web Title: Marketplace Housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.