लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुरी ओडिशा येथून गांधीग्रामकडे निघालेल्या रेल्वेगाडीत गांजातून तस्करी करण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाने हाणून पाडला. दरम्यान, गांजा पकडला जाणार असल्याची जाणीव झाल्याने तस्कर मात्र पळून गेले. गाडी क्रमांक १२९९४ पुरी-गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसमधील हा प्रकार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे गाड्यांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे लक्षात आल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) महानिरीक्षक मुन्नवर खुर्शिद आणि विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरपीएफच्या ठिकठिकाणच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आणि कारवाईचे निर्देश दिले आहे. यासाठी 'ऑपरेशन नार्कोस' राबविण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार, २२ जुलैला पूरी ओडिशा येथून नागपूरमार्गे गांधीग्राम, गुजरातकडे जात असलेल्या साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये भंडारा येथील आरपीएफ तसेच गुन्हे शोध पथक (सीआयबी) या गाडीची तपासणी करू लागले. त्यांना स्लिपर कोच एस-३ च्या ३३ नंबरच्या बर्थखाली एक ब्राऊन रंगाची पिट्टू बॅग आढळली. बाजुच्या प्रवाशांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी या बॅगबाबत अनभिज्ञता दाखवली. त्यामुळे व्हीडीओ शुटींग करून ती बॅग तपासण्यात आली. यावेळी त्या बॅगमध्ये ६ किलो, ३४८ ग्राम गांजा आढळला. बाजारपेठेत त्याची किंमत १ लाख, २७ हजार रुपये आहे. तो जप्त करण्याची प्रक्रिया करेपर्यंत गाडी नागपूर स्थानकावर पोहचली. त्यामुळे गांजा रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आला. पोलिसांनी २३ जुलैला गुन्हा दाखल करून गुरुवारी हे प्रकरण तपासासाठी गोंदिया रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरीत केले.
कुठे जाणार होता गांजा ?
गांजा पकडला जाणार, याची कल्पना येताच गांजाची तस्करी करणारे पळून गेले. त्यामुळे हा गांजा कुठे नेला जाणार होता, ते उघड होऊ शकले नाही. लोहमार्ग पोलीस त्याची चाैकशी करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारे रेल्वे गाड्यांमधून कुणी गांजा, दारू, तंबाखू किंवा इतर प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करत असल्याचे लक्षात आल्यास ती माहिती रेल्वे स्थानक, रेल्वे हेल्पलाईनवर १३९ किंवा जवळच्या रेल्वे पोलिसांना द्यावी, असे आवाहन आरपीएफने केले आहे.