मार्डचा आता एचआयव्हीविरुद्ध लढा
By Admin | Updated: November 30, 2015 02:38 IST2015-11-30T02:38:42+5:302015-11-30T02:38:42+5:30
देशात एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गेल्या दशकात या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे.

मार्डचा आता एचआयव्हीविरुद्ध लढा
मंगळवारपासून लावणार रेड रिबीन :
१५ ते २५ वयोगटातील युवकांचे करणार प्रबोधन
नागपूर : देशात एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच गेल्या दशकात या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ही पुढाकार घेणार आहे. १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनापासून ते आठवडाभर या रोगाची जनजागृतीची मोहीम चालवणार आहे. विशेष म्हणजे, सात दिवस रेड रिबीन लावून सर्व निवासी डॉक्टर आपली सेवा देतील. या शिवाय उपचारासाठी येणाऱ्या १५ ते २५ वर्षांच्या युवकांना एड्स विषयी माहिती देतील.
आजारांवर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे जास्त गरजेचे आहे. याच आधारावर सेंट्रल मार्डने जागतिक एड्स दिनापासून विविध उपक्रम हाती घेतले आहे. सेंट्रल मार्डचे अध्यक्ष सागर मुंधडा यांनी ‘लोकमत’ला सागितले, सात दिवस चालणाऱ्या या उपक्रमात राज्यातील सर्व निवासी डॉक्टर रेड रिबीन लावून आपली सेवा देणार आहेत. ‘प्रथम एचआयव्ही चाचणी नंतर कुंडली’ या घोषवाक्याचा प्रचारच नाहीतर स्वत: अमलातही आणतील. ज्या डॉक्टरांचे लग्न होणार आहे ते डॉक्टर कुंडलीची जुळवाजुळव करण्यापूर्वी स्वत:ची आणि होणाऱ्या पत्नीची एचआयव्ही चाचणी करतील. त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतील.
‘एड्स पासून मुक्ती’ सारख्या अनेक फसव्या जाहिरातींना उत आला आहे. विशेषत: ग्रामीण लोक याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी या संदर्भातील जाहिराती डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये असणार आहे. गावखेड्यातून आलेल्या रुग्णांना ही जाहिरात दाखवून जनजागृती केली जाणार आहे. एचआयव्हीला १५ ते २५ वयोगटातील सर्वाधिक युवक बळी पडतात. यासाठी प्रत्येक निवासी डॉक्टराकडे या वयोगटातील युवक आले तर त्यांच्या आजारावर उपचार करीत त्यांना एड्सबाबतची माहिती देतील. हा रोग कसा पसरतो, त्यावरील उपचार आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन करतील, असेही डॉ. मुंधडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)