उपराजधानीतही मराठ्यांची वज्रमुठ
By Admin | Updated: October 24, 2016 02:44 IST2016-10-24T02:44:11+5:302016-10-24T02:44:11+5:30
सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी

उपराजधानीतही मराठ्यांची वज्रमुठ
मोर्चाला १६ संघटनांचा पाठिंबा : पोलीस प्रशासनही सज्ज
नागपूर : सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता रेशीमबाग मैदानावरून निघणाऱ्या या मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
मागील तीन महिने राज्यभरात लाखोंच्या संख्येत निघालेल्या मोर्चानंतर आता नागपुरातील या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चातसुद्धा लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी येथील घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अॅट्रासिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासारख्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. विशेष म्हणजे, हा जिल्हास्तरीय मोर्चा असून, पुढील १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणारा मोर्चा राज्यस्तरीय राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. २५ आॅक्टोबरच्या मोर्चात पुरुषांसह महिला व तरुण-तरुणींची फार मोठी संख्या राहणार आहे. या मोर्चासाठी संपूर्ण विदर्भातील मराठा बांधव एकजूट होणार आहेत. सकल मराठा समाजाने या मोर्चासाठी एक आचारसंहिता तयार केली असून, त्यानुसार संपूर्ण नियोजन केले जात आहे. राज्यभरातील मोर्चाप्रमाणे या मोर्चाचे नेतृत्वसुद्धा पाच मुली करणार आहेत.
असा आहे मोर्चाचा मार्ग
२५ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चासाठी संपूर्ण विदर्भातून येणारे मराठा समाज बांधव रेशीमबाग मैदानावर एकत्रित होणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता मोर्चा मार्गक्रमण करून तो तुळशीबाग, महाल, गांधीगेट, सुभाष रोड, टेकडी रोड व संविधान चौकमार्गे दुपारी २ वाजताच्या सुमारास कस्तुरचंद पार्कवर पोहोचेल. येथे सर्वप्रथम कोपर्डी घटनेत बळी पडलेल्या निरपराध बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर जिजाऊ वंदन करून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पाच मुली मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणाऱ्या निवेदनाचे जाहीर वाचन करतील. तसेच यानंतर त्या मुली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. निवेदन सोपवून त्या मुली परत मोर्चेस्थळी येतील. निवेदन दिल्याची घोषणा केली जाईल आणि शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल.