मराठा मोर्चाने दिली नवी शिस्त, नवी प्रेरणा
By Admin | Updated: October 27, 2016 02:29 IST2016-10-27T02:29:05+5:302016-10-27T02:29:05+5:30
सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला.

मराठा मोर्चाने दिली नवी शिस्त, नवी प्रेरणा
इतर मोर्चेकरी आदर्श घेणार का? : नागपूरकरांचा शिस्तीला सलाम
नागपूर : सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने नागपूरकरांचे केवळ लक्षच वेधले नाही तर शिस्त, स्वच्छता आणि संयमाचे आदर्शही डोळ्यासमोर ठेवले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या मराठ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजूट होत, एकही नारा न देता, आरडाओरड, तोडफोड, दगडफेक न करता नि:शब्द हुंकार देत आपला आवाज बुलंद केला. त्यांच्या या शिस्तीला नागपूरकरांनी सलामही केला. या मोर्चाच्या निमित्ताने इतर मोर्चेकरी हा आदर्श घेणार का, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
मराठा क्रांती मूकमोर्चात समाजातील महिला आणि युवतीच्या हाती मोर्चाचे नेतृत्व सोपवून मराठ्यांचा जनसागर शिस्तबद्धरीत्या रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. मोर्चेकरी रेशीमबाग मैदानावर जमले. तेथून पाचच्या रांगेत शिस्तीत मोर्चा बाहेर पडला. हाती फलक होते. अनेकांच्या तोंडावर, दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. हजारो लोक मोर्चात सहभागी झाले मात्र मूकमोर्चा असल्यामुळे कुणीही एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हते. एवढेच नव्हे तर मोर्चातील एकहीजण मोबाईलवर बोलताना दिसले नाही. मोर्चा कस्तूरचंद पार्कवर पोहचेपर्यंत कुणीही मोर्चाच्या रांगेतून बाहेर पडले नाही. मोर्चा रस्त्यात मध्येमध्ये थांबायचा तोही एका ठरवून दिलेल्या शिस्तीत.
मोर्चेकऱ्यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी, वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ठराविक अंतरावर स्वयंसेवक तैनात होते. स्वयंसेवक मोर्चेकऱ्यांना पाण्याचे पाऊच द्यायचे. पाणी पिऊन झाले की पाऊच रस्त्यावर न फेकता ते पुन्हा स्वयंसेवकाकडे परत द्यायचे. स्वयंसेवक सर्व रिकामे पाऊच एका पिशवीत जमा करायचे. त्यामुळे रेशीमबाग ते कस्तूरचंद पार्कपर्यंतच्या रस्त्याने हजारोंचा मोर्चा गेल्यानंंतरही रस्त्यावर पाण्याचे एकही पाऊच किंवा कचरा पडलेला दिसला नाही. मोर्चेकरी कस्तूरचंद पार्कवर पोहचले. तेथे त्यांना बिस्किट पाकीट देण्यात आले. मात्र, बिस्किट खाल्यानंतर रिकामी झालेली पाकिटेदेखील गोळा करण्यात आलीत. कुणीही एकही बॅनर, पोस्टर, झेंडा रस्त्यावर टाकून दिला नाही. मोर्चानंतर सर्व सामग्री शिस्तबद्धरीत्या एका ठिकाणी गोळा करण्यात आली. यामुळे मोर्चानंतरही स्वच्छता पाहून येथून खरोखरच मोर्चा निघाला यावर विश्वासच बसत नव्हता.
एरवी मोर्चे म्हटले की पोलिसांवर प्रचंड दबाव असतो. त्यातही समाजाचे मोर्चे असले की पोलिसांना सावध भूमिका घ्यावी लागते. मात्र, या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी दाखविलेल्या शिस्तीमुळे पोलिसांना अजिबात मनस्ताप झाला नाही.
उलट आयोजकांनी पाण्याचे पाऊच व बिस्किटाची पाकिटे पोलिसांकडेही ठेवली होती. त्यामुळे पोलीसही मोर्चातील नागरिकांना स्वयंस्फूर्तपणे मदत करताना दिसले. नागपुरात आजवर अनेक मोर्चे निघाले. मात्र, अशी शिस्त, संयम व स्वच्छता क्वचितच पहायला मिळाली असेल. एरवी मोठमोठ्याने घोषणा देणाऱ्या मोर्चांकडे नागपूरकर एक मिनिट थांबून पाहतही नाही. मात्र, नि:शब्द निघालेला मोर्चा समोरून जात असल्याचे पाहून नागपूरकरही शांत अन् स्तब्ध होत या शिस्तीला सलाम करीत होते. (प्रतिनिधी)