मराठा एकवटणार
By Admin | Updated: October 25, 2016 02:48 IST2016-10-25T02:48:21+5:302016-10-25T02:48:21+5:30
आतापर्यंत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर आता

मराठा एकवटणार
नागपूर : आतापर्यंत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर आता सकल मराठा समाज उपराजधानीत आपली ताकद दाखविणार आहे. मंगळवारी लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरणार आहेत. कोपर्डी येथील घटनेनंतर ९ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथे पहिला मराठा क्रांती मूकमोर्चा निघाला होता. यानंतर महाराष्ट्रातील तब्बल २४ जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत मोर्चे निघाले. या सर्व मोर्चातून तब्बल तीन कोटी समाज बांधव रस्त्यांवर उतरले आहेत. या सर्व मोर्चांचे आजपर्यंत कुणीही नेतृत्व केलेले नाही. तीच आचारसंहिता नागपुरातील मोर्चादरम्यानसुद्धा पाळली जाणार आहे.
या मोर्चासाठी राज्यभरातून येणारे मराठा बांधव रेशीमबाग मैदानावर एकत्रित होणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. शिवाय यानंतर मोर्चा तुळशीबाग मार्गे, महाल, गांधीगेट, सुभाष रोड, टेकडी रोड व संविधान चौक असे मार्गक्रमण करीत दुपारी २ वाजताच्या सुमारास कस्तूरचंद पार्क येथे पोहोचेल. या मोर्चात अडीच ते तीन लाख मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीने या मोर्चाची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे या मोर्चात पुरुषांसह महिला आणि तरुण-तरुणींचा प्रचंड सहभाग राहणार आहे. तरुण-तरुणींमध्ये या मोर्चाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
१५ रुग्णवाहिकांसह २०० डॉक्टरांची चमू
मराठा क्रांती मूकमोर्चात १५ रुग्णवाहिकांसह २०० डॉक्टरांच्या चमूचा सहभाग राहणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, केडीके डेंटल कॉलेज व लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समावेश राहणार आहे.
या आहेत मागण्या
१) कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या.
२) मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे.
३) अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबावा.
४) अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा.
५) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,
६) शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा.