अनेक निकालांची ‘डेडलाईन’ चुकली

By Admin | Updated: July 29, 2015 03:01 IST2015-07-29T03:01:17+5:302015-07-29T03:01:17+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच आहेत.

Many deadlines miss 'deadline' | अनेक निकालांची ‘डेडलाईन’ चुकली

अनेक निकालांची ‘डेडलाईन’ चुकली

नागपूर विद्यापीठ : अभियांत्रिकीचे सर्व निकाल ३० जुलैपर्यंत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच आहेत. विद्यापीठाने निकाल कधी जाहीर होणार याची यादी संकेतस्थळावर टाकली होती. परंतु यातील वेळापत्रकानुसार अनेक अभ्यासक्रमांचे निकाल ‘डेडलाईन’ टळून गेल्यावरदेखील लागलेले नाहीत.
विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या मोठमोठ्या दाव्यांचे काय झाले असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान अभियांत्रिकीचे सर्व निकाल ३० जुलैपर्यंत घोषित होतील असा दावा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला आहे.
विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने निकाल कधी लागतील याची यादी जाहीर केली होती. या यादीत नमूद केलेली तारीख उलटून गेल्यावरदेखील अनेक निकाल जाहीर झालेलेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
यामुळे, विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जात आहे. विद्यापीठाने कधी तरी आपला शब्द पाळावा अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा निकाल लागला असून आता अंतिम आणि द्वितीय वर्षाचे निकाल कधी लागणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे मागील आठवड्यात एमटेकचे प्रवेश सुरू झाले आहेत. प्रवेशपूर्व परीक्षा केव्हाच पार पडली असून आता प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे, मात्र अंतिम वर्षाचा निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थी संघटनांची विद्यापीठावर धडक
दरम्यान, लवकरात लवकर विद्यापीठाने निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.महाराष्ट्र निवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक अनिल हिरेखन यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले. एप्रिल महिन्यात परीक्षा होऊनदेखील अद्याप निकाल कसा लागत नाही असा सवाल यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. छात्र युवा संघर्ष समितीनेदेखील याच मुद्द्यावर कुलगुरूंची भेट घेतली. निकाल वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होत असून त्यांच्या स्थितीसाठी विद्यापीठच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Many deadlines miss 'deadline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.