भावेशला जगविण्यासाठी पुढे आला माणुसकीचा हात
By Admin | Updated: July 17, 2015 03:11 IST2015-07-17T03:11:57+5:302015-07-17T03:11:57+5:30
आठ महिन्याचा चिमुकला भावेश सध्या जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. परंतु वडिलांची आर्थिक परिस्थिती मात्र बेताची आहे, ...

भावेशला जगविण्यासाठी पुढे आला माणुसकीचा हात
लोकमत मदतीचा हात
फुले-आंबेडकर समारोह समितीचा पुढाकार : १५ हजाराचा धनादेश प्रदान
नागपूर : आठ महिन्याचा चिमुकला भावेश सध्या जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. परंतु वडिलांची आर्थिक परिस्थिती मात्र बेताची आहे, अशा परिस्थितीत लोकमतने भावेशच्या उपचारासाठी समाजाने मदत करावी, यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फुले-आंबेडकर समारोह समितीने पुढाकार घेत भावेशच्या वडिलांना १५ हजाराची आर्थिक मदत करीत माणुसकीचा हात दिला.
भावेशचे वडील प्रकाश डोईजड हे घराघरात सिलिंडर पोहोचवण्याचे काम करतात. ते सावनेरला राहतात. भावेशला जन्मापासूनच अन्ननलिका नाही. यासाठी त्याची थुंकी बाहेर पडावी म्हणून मानेत छिद्र करून नळी टाकली आहे. तर त्याची भूक शमविण्यासाठी पोटात छिद्र केले. या छिद्राद्वारे टाकलेल्या कृत्रिम नळीतून इंजेक्शनद्वारे दूध दिले जाते. भावेशची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया सांगितली आहे. यासाठी ३ लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. एवढा खर्च भावेशच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे.
या पार्श्वभूमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून मदतीचे आवाहन करताचा फुले-आंबेडकर समारोह समितीच्या सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला. हे सर्व सदस्य स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी भावेशच्या वडिलांना १५ हजार रुपयाचा धनादेश दिला. (प्रतिनिधी)