गरजू मुलांना तो देतोय यशाचा मंत्र!
By Admin | Updated: November 27, 2014 00:19 IST2014-11-27T00:19:18+5:302014-11-27T00:19:18+5:30
‘बच्चा काबील बनो काबील, कामयाबी झक मारके पिछे दौडती है’, थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खानच्या केवळ या संदेशाने देशातील युवकांना प्रेरणा मिळाली. हाच संदेश गेल्या ३५ वर्षांपासून

गरजू मुलांना तो देतोय यशाचा मंत्र!
खरा रॅन्चो जहांगीर : आमिरच्या चित्रपटात जहांगीरची स्कूटरचक्की
नागपूर : ‘बच्चा काबील बनो काबील, कामयाबी झक मारके पिछे दौडती है’, थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खानच्या केवळ या संदेशाने देशातील युवकांना प्रेरणा मिळाली. हाच संदेश गेल्या ३५ वर्षांपासून तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्यांना जीवनाचा मार्ग दाखविण्याचे कार्य पहिला वर्ग शिकलेला शेख जहांगीर शेख उस्मानी ‘रॅन्चो इनोव्हेशन स्कूल’मधून करतो आहे. जहांगीरने बनविलेली स्कूटरचक्की चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झाली. मात्र जहांगीरचा हुनर कधीही पुढे आला नाही. चित्रपटातून संदेश देऊन आमिर दुसऱ्या कामालाही लागला. जहांगीर मात्र राज्यातील गोरगरीब युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी आजही झटतो आहे.
ग्रामीण भागातील लोडशेडिंगवर मात करण्यासाठी जहांगीरने स्कूटरचक्की बनविली. नॅशनल इन्व्हेंशन फाऊंडेशनतर्फे अहमदाबाद येथे आयोजित एका प्रदर्शनात जहांगीरची स्कूटरचक्की डेमो म्हणून ठेवली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राजू हिराणी यांचे स्कूटरकडे लक्ष गेले. स्कूटरची थ्री इडियट या चित्रपटासाठी निवड केली. पुढे चित्रपटाच्या माध्यमातून जहांगीरची स्कूटर जगभर प्रसिद्ध झाली. स्कूटरचक्की बरोबरच स्पे्र पेंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या जहांगीरने स्कूटरला कॉम्प्रेसरचा जुगाड लावून, वीजेविना चालणारे स्पे्र पेंटिंगचे यंत्र बनविले. चाबीद्वारे चालणारे चार्जर, सायकल मिक्सर यासारख्या अनेक वस्तू त्यांनी बनविल्या आहे. सध्या ते चाबीद्वारे धावणारे चारचाकी वाहन बनवित आहे.
लवकरच त्यांचा हा आविष्कार पूर्णत्वास येईल, असा दावा त्यांचा आहे. जहांगीरने केलेल्या आविष्काराबद्दल राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मानही झाला आहे. आपल्यातील कलागुण समाजातील गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करावे, यासाठी ते गेल्या १५ वर्षापासून प्रशिक्षण देतात. आजपर्यंत त्यांनी जळगाव आणि ग्रामीण भागातील ३० हजारावर युवकांना प्रशिक्षण दिले आहे. २०० युवकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले आहे. आदिवासी भागातील, झोपडपट्टीतील मुलांना ते प्रशिक्षित करण्याचे काम करीत आहे. तीन वर्षापूर्वी त्यांनी रॅन्चो इनोव्हेशन स्कूलची स्थापना केली आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी
सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना पुस्तकाद्वारे केवळ ज्ञान दिले जात आहे. प्रॅक्टिकलच्या रूपाने विज्ञान नेमके काय हे शिकविणे आजच्या विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. हे शिकविल्या जात नसल्याने, लाखो खर्च करून विद्यार्थी डिग्री घेऊनही बेरोजगार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढावी, हा प्रयत्न आहे. यासाठी राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने विज्ञान शिकवून त्यांच्यात विज्ञानाप्रती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. नागपुरातील काही उर्दु माध्यमांच्या शाळांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे जहांगीर म्हणाले.