मंदाताई आमटेंच्या धाडीने दिले दारूबंदी आंदोलनाला बळ
By Admin | Updated: September 2, 2014 01:09 IST2014-09-02T01:09:03+5:302014-09-02T01:09:03+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या दारूने अनेक जीव घेतले आहेत. तरीही राज्याचा उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री

मंदाताई आमटेंच्या धाडीने दिले दारूबंदी आंदोलनाला बळ
भामरागडात जप्त केली दारू : चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आंदोलन तापण्याची शक्यता
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या दारूने अनेक जीव घेतले आहेत. तरीही राज्याचा उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे गावागावातील महिलांनाच आता दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शेकडो महिलांसह भामरागडसारख्या दुर्गम गावात दारूविक्रेत्यांवर धाड घालून अवैध दारुसाठा पकडण्यास पोलिसांना भाग पाडले. मंदातार्इंचे हे आंदोलन गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी सक्रिय काम करणाऱ्या अनेक महिला व पुरूषांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शासनाने महाराष्ट्रात वर्धा व गडचिरोली या दोन जिल्ह्यात दारूबंदी केलीे. मात्र दोन्ही ठिकाणी राजरोस विक्री सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत चारही बाजूंना ३० ते ३५ दारू दुकानांचा वेढा पडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूचे मोठे व्यापारी येथे राजरोसपणे माल पुरवीत आहेत.
चंद्रपूर जिल्हा संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी जोर धरत असताना कोकणातील काही दुकानांनाही गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दुकाने थाटण्यासाठी परवाने देण्यात येत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनावर नक्षल मोहिमेचा भार असल्याने दारूबंदी विरोधात काम करताना त्यांना अडचणी येतात. मात्र उत्पादन शुल्क विभागाला कोणतीही अडचण नाही.
जिल्ह्यात विषारी दारूही मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. पोळ्याच्या दिवशी आरमोरी तालुक्याच्या वनखी गावात एका तरूणाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. भामरागड गावात मागील काही वर्षात अवैध दारू विकण्यावर बंधने आली होती. मात्र अलीकडे खुलेआम विक्री वाढल्याने महिलांचा त्रासही वाढला आहे.
ही बाब लक्षात घेऊन डॉ. मंदाकिनी आमटे व त्यांच्या कुटुंबातील महिलांसह शेकडो महिलांनी गावातील दारूविक्रेत्यांवर धाड मारुन साडेचार लाखाची दारू जप्त केली व पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. मंदातार्इंच्या दारूबंदीविषयक भूमिकेमुळे आंदोलनातील महिलांना बळ मिळाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनालाही आता बळकटी मिळणार आहे. राज्य सरकारने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तिनही जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी यापूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)