लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जबाजारी झाल्यामुळे आणि पत्नीवर संशय घेत असल्यामुळे वाहनांना कुशन लावण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने पत्नी व मुलावर चाकूने हल्ला करून स्वतःच्या गळ्यावर चाकू मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास जुना बगडगंज परिसरात घडली. जखमी पती-पत्नी व मुलाला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले असून, पत्नीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रवी लक्ष्मण नांदुरकर (३६, रा. जुना बगडगंज) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो वाहनांना कुशन लावणे, चप्पल-जोडे शिवण्याचा व्यवसाय करतो. त्याच्या कुटुंबात पत्नी पिंकी (३६), मुलगा यश (१४) आणि पीयूष (१२) आहेत. पत्नी पिंकी एका खासगी दुकानात काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी २० दिवसांपूर्वी जुना बगडगंजमध्ये देवीदास मेंढुले यांच्या घरी भाड्याने राहण्यासाठी आला. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे रवीने पत्नी आणि मुलांसह भोजन केल्यानंतर सर्व जण झोपी गेले. पहाटे ४ वाजता रवी झोपेतून जागा झाला. त्याने पत्नी पिंकीच्या गळ्यावर चाकूने वार केल्यामुळे ती झोपेतून जागी होऊन जोरात ओरडली. पिंकीच्या ओरडण्यामुळे बाजूलाच झोपलेला मोठा मुलगा यश जागा झाला. त्याने वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपी रवीने मुलगा यशवरही चाकूने वार केला. परंतु, त्याने वार चुकवला. मात्र, त्याच्या दोन बोटांना चाकू लागून तो जखमी झाला. या प्रकाराने घरात आरडाओरड झाली आणि घरमालक झोपेतून जागे झाले. त्यांनी आरोपीच्या खोलीकडे धाव घेतली.
त्यांनी रवीला आवाज देऊन काय झाले? अशी विचारणा केली असता त्याने काहीच झाले नाही, असे सांगितले. परंतु, शेजाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता पिंकीच्या गळ्यातून रक्त बाहेर येत असून, रवीच्या हातात चाकू असल्याचे दिसले. त्यानंतर आरोपी रवीने आपल्या गळ्यावरही चाकूने वार केला.
रवी जखमी झाल्यामुळे पिंकीने प्रसंगावधान राखून दरवाजा उघडला. मात्र, बाहेर पडताच ती खाली कोसळली. घरमालक मेंढुले यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. नंदनवन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक कोळी आणि पोलिसांनी आरोपी रवी, पिंकी आणि यशला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे पिंकीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
संशयाच्या भुताने पछाडलेआरोपी रवीची पत्नी पिंकी ही एका खासगी दुकानात काम करीत होती. परंतु, रवी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याशिवाय आरोपी रवीने ३ लाख ५० हजारांचे कर्ज घेतल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. यातूनच त्याने कुटुंबाला संपवून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा संशय आहे.