भारतीय संविधानाच्या निर्मितीवर महामालिका
By Admin | Updated: July 6, 2015 03:15 IST2015-07-06T03:15:05+5:302015-07-06T03:15:05+5:30
भारतात विविध भाषा, धर्म, संस्कृती, प्रथा आणि परंपरा असूनही हा देश आजवर एकसंघ कसा राहिला आहे,

भारतीय संविधानाच्या निर्मितीवर महामालिका
नागपूर : भारतात विविध भाषा, धर्म, संस्कृती, प्रथा आणि परंपरा असूनही हा देश आजवर एकसंघ कसा राहिला आहे, याचे जगाला आश्चर्य आहे. विविधतेत एकता असे भारताची ओळख आहे. देशाला एकजूट ठेवण्याचे हे काम खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाने केले आहे. समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्यावर आधारित भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून गणले जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्य अथक परिश्रमातून साकारलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीमागची खरी कहाणी आता सर्वसामान्य जनतेलाही पाहता येणार आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही व मैत्री संघाने यासाठी पुढाकार घेतला असून भारतीय संविधानावर मेगा मालिका तयार केली जात आहे.
नागपूरपासून जवळच असलेल्या बुद्धनगरीमध्ये या मेगा सिरियलच्या निर्मितीला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसातच बुद्धनगरीमध्ये भव्यदिव्य असा स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. संसदेचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागपूरच्याच सुरेश मेश्राम डेकोरेशनने हा भव्यदिव्य सेट उभारला आहे. लॉर्ड बुद्ध टीव्ही आणि मैत्री संघाचे भय्याजी खैरकर, सचिन मून व राजू मून यांची निर्मिती असलेल्या या महामालिकेचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नरेंद्र शिंदे करीत आहेत. अॅड. रवि शंभरकर, प्रा. देवीदास घोडेस्वार आणि भय्याजी खैरकर यांनी पटकथा लिहिली आहे. नागपूरचेच विनोद राऊत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुख्य भूमिका निभवत आहेत. देवेंद्र दोडके-डॉ. राजेंद्र प्रसाद, अनिल पालकर - पं. जवाहरलाल नेहरू, मधू जोशी- सरदार पटेल, शक्ती रतन सच्चिदानंद सिन्हा आणि प्रदीप रोंगे हे डॉ. जयकर यांची भूमिका साकारीत आहेत. अभय बॅनडिक्ट हे कॅमेरामन आहे. मेकअप-बाबा खिरेकर, तर लाईटची व्यवस्था गणेश वाघमारे, अनिल भालेराव, युवराज केळवदकर, अंकित वर्मा सांभाळत आहेत. कलावंत व संपूर्ण युनिटची व्यवस्था नरेंद्र खैरकर सांभाळत आहेत. मालिकेचे चित्रीकरण दिवसरात्र सुरू असून दोन महिन्यात ते पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)