मामा तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाला गती द्या
By Admin | Updated: October 8, 2016 03:06 IST2016-10-08T03:06:12+5:302016-10-08T03:06:12+5:30
पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमधील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेल्या

मामा तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाला गती द्या
नागपूर : पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांमधील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेल्या निधीची पूर्तता करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी या कामाला गती द्यावी, असे निर्देश वित्त व नियोजन, वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर विभागातील चारही जिल्ह्यांतील मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला गती देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी २० जेसीबी मशीन आणि ६० टिप्पर्सची खरेदी करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच माजी मालगुजारी तलावांसाठी मंजूर १५० कोटी रुपयांच्या निधीतून यासाठी निधी उपलब्ध केला जाईल, तसेच नरेगामधूनही निधी उपलब्ध करून देण्याचे शासन प्रयत्नशील असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. तलावातील गाळ काढण्याचे काम कंत्राटदारांमार्फत न करता ते जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी संघटनेकडील यंत्रसामुग्रीद्वारे करणे अनिवार्य राहील.
मामा तलावातील गाळ काढण्याचे काम जानेवारी २०१६ पासून सुरू असून नागपूर जिल्ह्यातील दोन तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. भंडारा जिल्ह्यात ४१ तलाव, गोंदियात ५२ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ९ माजी मालगुजारी तलावांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर विभागातील एकूण २५९ पैकी १०४ तलावांमधील गाळ पूर्ण काढण्यात आला आहे. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी २०१६-१७ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात १७२९ तलाव असून त्यासाठी ८०.९८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात १६४५ तलाव असून ३८.६२ कोटीचा निधी, गोंदिया जिल्ह्यातील १७४८ तलावांसाठी २९.२१ कोटी, भंडारा जिल्ह्यातील ११५१ तलावांसाठी ५०.२१ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील २१६ तलावांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. (प्रतिनिधी)
सिनाळा व भटाळी प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष शिबिर
वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. शी संबंधित चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावणे आणि सिनाळा व भटाळी येथील ४०९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी २४ व २५ आॅक्टोबर रोजी बाधित गावांमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश वित्त व नियोजन, वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना दिले.