नरखेड ग्रामीण रुग्णालयाचा होणार मेकओव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:36+5:302021-04-30T04:11:36+5:30
नरखेड : नरखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अपुऱ्या सुविधांअभावी रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र आता नरखेड ...

नरखेड ग्रामीण रुग्णालयाचा होणार मेकओव्हर
नरखेड : नरखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अपुऱ्या सुविधांअभावी रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र आता नरखेड ग्रामीण रुग्णालयाचा तातडीने मेकओव्हर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेड व ६० हजार लिटरची ऑक्सिजन टँक तातडीने उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होते. त्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडते. त्यामुळे नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड रुग्णांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. तीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता येरखडे उपस्थित होते. बैठकीत नरखेड ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन बेड व आवश्यक सामग्रीसाठी ३५ लाख रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने हे काम सुरू करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.