ट्रॅफिकचे झोन विधानसभा मतदारसंघनिहाय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:59 IST2017-08-12T00:59:14+5:302017-08-12T00:59:46+5:30
नागपूर शहरात सध्या अजनी, इंदोरा, सिव्हील लाईन्स, सी.ए.रोड या ठिकाणी वाहतूक विभागाचे झोन आहेत. या झोनची स्थापना फार पूर्वी करण्यात आली.

ट्रॅफिकचे झोन विधानसभा मतदारसंघनिहाय करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात सध्या अजनी, इंदोरा, सिव्हील लाईन्स, सी.ए.रोड या ठिकाणी वाहतूक विभागाचे झोन आहेत. या झोनची स्थापना फार पूर्वी करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या सुद्धा फार कमी होती. परंतु आजच्या परिस्थितीनुसार हे झोन सुसंगत वाटत नाही. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय ट्रॅफिक झोन तयार करावे, अशी मागणी नागपुरातील भाजपाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नागपुरात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर चारचाकी वाहन देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आरटीओची विभागणी करून पूर्व नागपुरात एक नवीन आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. सध्या वाहतूक विभागाची व्यवस्था एका-एका विधानसभा क्षेत्रामध्ये तीन-तीन विभागात येते. त्यामुळे कोणत्या विधानसभा क्षेत्राचा भाग कोणत्या विभागात येतो, हेच नागरिकांना कळत नाही. पूर्व विधानसभा क्षेत्र हे उत्तर, पूर्व व दक्षिण या तिन्ही वाहतूक विभागात येते. शहरातील सर्व विधानसभा क्षेत्राची अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना चालान भरण्याकरिता व अन्य बाबतीत देखील फार त्रास सहन करावा लागतो. कोणताही कार्यक्रम करावयाचा असला तर वाहतूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु नागरिकांना हेच कळत नाही की त्याचा भाग कुठल्या क्षेत्रात येतो.
अशाच प्रकारची स्थिती रेशनिंग विभागाची होती. ती आपण विधानसभा क्षेत्राप्रमाणे केली असल्यामुळे नागरिकांना फार दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे याच धर्तीवर ट्रॅफिक झोन विधानसभा क्षेत्रानुसार करावे, अशा मागणीचे निवेदन कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले. त्या अनुषंगाने गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून तातडीने कारवाई करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.