महिलेची हत्या करून केला आत्महत्येचा बनाव
By Admin | Updated: November 7, 2016 02:41 IST2016-11-07T02:41:40+5:302016-11-07T02:41:40+5:30
एका नराधमाने निराधार महिलेचा तिच्या मुलीसमोरच खून केला. नंतर मृतदेहाला गळफास लावून आत्महत्येचा कांगावा केला.

महिलेची हत्या करून केला आत्महत्येचा बनाव
आरोपीचे पाप उघड : नंदनवनमधील घटना
नागपूर : एका नराधमाने निराधार महिलेचा तिच्या मुलीसमोरच खून केला. नंतर मृतदेहाला गळफास लावून आत्महत्येचा कांगावा केला. मात्र, मृत महिलेच्या प्रत्यक्षदर्शी मुलींमुळे आरोपीचे पाप उघड झाले आणि नंदनवन पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली.
शाहिन अज्जूम अहमद अली (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी ती पतीपासून विभक्त झाली. दोन मुलींचे भरणपोषण करण्यासाठी ती आरोपी शेख शब्बीर शेख रमजान (वय ४४) याच्या कुलरच्या कारखान्यात काम करू लागली. आरोपीने ती निराधार असल्याचे पाहून तिला स्वत:ची एक रूम देऊन ठेवून घेतले. तो तिच्यावर पत्नीसारखा हक्क दाखवायचा. मारहाण करायचा. तिच्या चारित्र्यावरही संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात अलीकडे सारखे खटके उडायचे.
शनिवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास अशाच प्रकारे संशय घेऊन आरोपी शब्बीरने शाहिनला मारहाण सुरू केली. एवढेच नव्हे तर तिचा गळा दाबून तिला तिच्या मुलीसमोर ठार मारले आणि शाहिनचा मृतदेह गळफास लावून वर टांगला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारू, अशी मुलींना धमकी दिली. त्यानंतर बाहेर जाऊन शाहिनने आत्महत्या केल्याचा कांगावा करू लागला. शाहिनाची आई रईसा अनवर पठाण (वय ४२, रा. रामकृष्ण नगर) यांना त्यांच्या नातींनी घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आरोपी पळून गेला. रईसा यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी शब्बीरविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)
संशयखोर पतीमुळे महिलेची आत्महत्या
मानकापूरच्या एकतानगरात संगीता किसन चव्हाण (वय ४५) या महिलेने संशयखोर नवऱ्यामुळे आत्महत्या केली. प्रेमसेवा होस्टेलजवळ राहणारा आरोपी किसन निवृत्तीराव चव्हाण (वय ४८) हा पत्नी संगीतांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. नुकत्याच झालेल्या एका पारिवारिक सोहळ्यात त्याने संगीतावर नको ते आरोप लावून तिला सर्वांसमोर अपमानित केले. तरुण मुलगा आणि नातेवाईकांसमोर वारंवार अपमान आणि बदनामी होत असल्यामुळे संगीता यांनी शनिवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी एका चिठ्ठीत आपली व्यथा लिहून ठेवली. मुलगा अजय किसन चव्हाण (वय २१) हा घरी आल्यानंतर आत्महत्येची घटना उघडकीस आली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी किसन चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.