सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ’ बनावी!

By Admin | Updated: February 23, 2015 02:38 IST2015-02-23T02:38:54+5:302015-02-23T02:38:54+5:30

सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी, ती नैमित्तिक ठरू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Make the safety 'She's Life'! | सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ’ बनावी!

सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ’ बनावी!

नागपूर : सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी, ती नैमित्तिक ठरू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जीवन सुरक्षा प्रकल्पातर्फे दिवंगत मोहन जावडेकर स्मृती विदर्भस्तरीय ‘रस्ते अपघात रक्षक पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आयटी पार्क मार्गावरील कविकुलगुरू कालिदास सभागृहात पार पडलेल्या या समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर उदयभास्कर नायर, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह, पुरस्कार समारंभ समितीचे अध्यक्ष नगरसेवक संदीप जोशी, प्रा. राजा आकाश, समीर बेंद्रे, रूपाली जावडेकर, शरद जिचकार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी कार्यक्रम घेतो, जनजागरणाचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न नियमित व्हावेत; कारण अपघातात जीव एखाद्याचा जातो. मात्र, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबीयांना सहन करावे लागतात. त्यामुळे सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी. अपघात झाल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आम्ही अपघातच होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे. देशात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते अपघात होत असल्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांनी अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज विशद केली. नागपूरला अपघातमुक्त शहर वनविण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी जीवन सुरक्षा प्रकल्प तसेच परसिस्टंटचे जे कार्य आहे त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, नगरसेवक जोशी यांनी प्रस्तावना केली. अध्यक्ष राजू वाघ यांनी प्रकल्पाचा उद्देश विशद केला. आम्ही आतापर्यंत २०० लोकांचे प्राण वाचविले आणि १५०० अपघातग्रस्तांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. भारतात अशाप्रकारे कार्य करणारी एकमात्र संघटना असल्याचेही ते म्हणाले.
जीवन सुरक्षा प्रकल्पाने तयार केलेल्या संकेतस्थळाचेही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. अपघाताची संबंधित यंत्रणांना माहिती देऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून केले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन मंदार धर्माधिकारी यांनी केले. परसिस्टंटच्या युवक-युवतींनी अपघात कसे टाळता येईल, त्याचा संदेश देण्यासाठी एक पथनाट्यही सादर केले.
या कार्यक्रमात विदर्भात ठिकठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रक्षकांनाही यावेळी मोमेन्टो देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणाच्या समारंभापूर्वी डॉ. संजय दाचेवार यांनी अपघातग्रस्तांना कशी मदत करायची, याविषयी माहिती दिली. (प्रतिनिधी)
लोकमतच्या राजेश टिकले यांना
उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार
जीवन सुरक्षातर्फे उत्कृष्ट छायाचित्रासाठी प्रदान करण्यात आलेला पुरस्कार लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार राजेश टिकले यांनी मिळवला. जोखीम पत्करून अपघातग्रस्तांना मदत करणारे शौर्य पुरस्कार राजेंद्र वानखेडे, अमन बोरे आणि विनोद गजभिये यांना प्रदान करण्यात आले. वृत्त संकलनासाठी पत्रकार अनिल फेकरीकर यांना तर उल्लेखनीय कामगिरीबद्दल शरद बागडी आणि वाहतूक शाखा एमआयडीसीचे पोलीस कर्मचारी संदीप बोरकर यांना देण्यात आला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Web Title: Make the safety 'She's Life'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.