वानाडोंगरी येथील कोविड सेंटरला आरोग्य सुविधा त्वरित उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:24+5:302021-04-20T04:09:24+5:30
वानाडोंगरी : वानाडोंगरी येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु या केंद्रावर ...

वानाडोंगरी येथील कोविड सेंटरला आरोग्य सुविधा त्वरित उपलब्ध करा
वानाडोंगरी : वानाडोंगरी येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु या केंद्रावर प्रशासनाच्या वतीने योग्य आरोग्यविषयक सुविधा अद्यापही उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी येथे तातडीने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे.
हिंगणा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात औद्योगिक वसाहतीत काम करणारा मोठा वर्ग आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. सदर कोविड केअर केंद्रात ७० खाटा उपलब्ध आहेत. परंतु ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांची टंचाई आहे. हे कोविड केंद्र इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनीसुद्धा विशेष लक्ष देऊन येथे आरोग्यविषयक सुविधांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी बंग यांनी केली आहे.