सीमा तपासणी नाक्यांना आकस्मिक भेट द्या
By Admin | Updated: September 8, 2015 05:30 IST2015-09-08T05:30:56+5:302015-09-08T05:30:56+5:30
राज्यातील दोन ते तीन सीमा तपासणी नाक्यांना एकाचवेळी अकस्मात भेट देऊन तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत

सीमा तपासणी नाक्यांना आकस्मिक भेट द्या
नागपूर : राज्यातील दोन ते तीन सीमा तपासणी नाक्यांना एकाचवेळी अकस्मात भेट देऊन तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही हे तपासावे व त्याकरिता जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने परिवहन आयुक्तांना दिले आहेत. यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत वेळ मंजूर करण्यात आला आहे.
याविषयी परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील २२ सीमा तपासणी नाक्यांच्या आधुनिकीकरणाचे काम महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क कंपनीला दिले आहे.
परंतु अद्यापही सीमा तपासणी नाक्यांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, अशी याचिकाकर्त्याची तक्रार आहे. याशिवाय महाराष्ट्र मोटर वाहन नियम २२३ (६)अनुसार नाक्यांवर ट्रक व इतर मालवाहू वाहनांचे वजन करताना मोटर वाहन निरीक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ८ एप्रिल २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाहनाचे वजन करणे, मालाची माहिती नमूद करणे, स्कॅनिंग करणे, पार्किंग इत्यादीसाठी मालवाहू वाहनांकडून प्रक्रिया शुल्क वसूल करायला पाहिजे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)