शहर पोलीस दलात मोठे फेरबदल

By Admin | Updated: June 7, 2015 02:55 IST2015-06-07T02:55:15+5:302015-06-07T02:55:15+5:30

गुन्हेशाखेसह शहर पोलीस दलातील ९२२ कर्मचाऱ्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या.

Major reshuffle in the city police force | शहर पोलीस दलात मोठे फेरबदल

शहर पोलीस दलात मोठे फेरबदल

नागपूर : गुन्हेशाखेसह शहर पोलीस दलातील ९२२ कर्मचाऱ्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या. गुन्हेशाखेतील १४ कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी स्थानांतरित करून २० कर्मचाऱ्यांना आत घेण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचा कारभार चर्चेचा विषय बनला आहे. वरिष्ठ अधिकारी ‘कुछ कर दिखाना है‘ अशा मानसिकतेचे असताना देखील अनेक कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या भूमिकेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत.
शहरातील अवैध धंदे आणि समाजकंटकांकडे जाऊन हप्ता वसुली करण्याचा एक कलमी कार्यक्रम काही जण राबवत आहे. त्यामुळे भली मोठी फौज असूनही पोलिसांना शहरात घातक शस्त्रे मिळत नाही. अवैध धंदे बिनबोभाट सुरू असताना त्या ठिकाणी धाड पडत नाही.
अवैध दारूच नव्हे तर गर्द, चरस, गांजाची तस्करी आणि विक्री बिनधास्त सुरू आहे. छोटे मोठे जुगार क्लब, मटक्याचे अड्डे आणि मोठ मोठे बुकी बिनधास्त अड्डे चालवत आहेत. काही हॉटेलमध्ये अवैध धंदे सुरू आहेत. या सर्व गैरप्रकाराची वरिष्ठांना माहिती देऊन तेथे कारवाईसाठी पुढाकार घेण्याऐवजी काही कर्मचारी ‘गुन्हेगार आणि अवैधंदेवाल्यांची मुखबिरी करीत आहेत‘. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांना सूचना मिळते.
परिणामी पोलिसांचा दबदबा कमी झाला आहे.(प्रतिनिधी)
गुन्हेशाखेचा अभ्यास
वरिष्ठ प्रामाणिक असूनही गुन्हेशाखेचा धडाका दिसत नसल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेतच उलटसुलट चर्चा सुरू आहे. ती लक्षात आल्यानंतर गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी ‘गुन्हेशाखेचाच अभ्यास‘ सुरू केला. त्यातून काही कर्मचाऱ्यांची नावे अधोरेखित झाली. गेल्या ६ महिन्यात कोणतीही कामगिरी न बजावणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारची उपयुक्त माहिती वरिष्ठांपर्यंत पोहचविणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. काही संशयास्पद भूमिकेत वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही नावे यादीत समाविष्ट करण्यात आली.
गुन्हेशाखेतील १४ कर्मचाऱ्यांचा समावेश
शनिवारी शहर पोलीस दलातील ९२२ कर्मचाऱ्यांची एकसाथ बदली करण्यात आली. त्यात गुन्हेशाखेच्याही १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही कर्मचारी डिफॉल्टर आणि निष्क्रिय आहेत. मात्र, काही चांगले कर्मचारी असूनही त्यांच्या बदल्या झाल्या. हे कर्मचारी ‘चुगल्यांचा शिकार‘ बनल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, अनेक वादग्रस्त कर्मचारी गुन्हेशाखेला अद्याप चिकटून आहेत. तर, शनिवारी ‘इनकमिंग‘च्या यादीत असलेल्यांमध्येही अनेक कर्मचारी वादग्रस्त पार्श्वभूमीचे धनी आहेत.

दोन उपायुक्तांचा खांदेपालट
शहर पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांचा शनिवारी खांदेपालट करण्यात आला. परिमंडळ एकच्या उपायुक्त निर्मलादेवी एस यांना मुख्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली तर, त्यांच्या जागी मुख्यालयाचे उपायुक्त शैलेश बलकवडे यांना नियुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे, बलकवडे दोन आठवड्यांपूर्वीच नागपुरात रुजू झाले. २१ मे रोजी त्यांनी मुख्यालयाचा पदभार सांभाळला. आता १५ दिवसांतच त्यांना परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून रुजू होण्याचे आदेश शनिवारी पोलीस आयुक्तालयातून मिळाले. सोमवारी ते पदभार सांभाळणार आहेत.

Web Title: Major reshuffle in the city police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.