काटोल : पोलीस पाटलांना पदाचा अधिकार आणि जबाबदारी याची माहिती असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींची जाणीव ठेवत पोलीस पाटलांनी गावाची शांतता व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी कार्य करावे, आवाहन काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी केले.
लहानुजी महाराज सभागृह येथे काटोल उपविभागातील पोलीस पाटलांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये उंबरकर यांनी उपस्थित पोलील पाटलांशी संवाद साधला. उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, तहसीलदार अजय चरडे, काटोलचे ठाणेदार महादेव आचरेकर, नरखेडचे ठाणेदार जयपाल सिंह गिरासे, कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार, जलालखेडा ठाणेदार मंगेश काळे याप्रसंगी उपस्थित होते.
पोलीस पाटलाची भूमिका ही गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याप्रमाणे कशी आहे, याबाबत नागेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात ठाणेदार आचरेकर यांनी शिबिर आयोजनाची गरज आणि पोलीस प्रशासन सुव्यवस्थित चालवण्याकरिता पोलीस पाटलांची भूमिका, यावर ठाणेदार महादेव आचरेकर यांनी माहिती दिली.
पोलीस पाटलांना काम करताना गाव पातळीवर अनेक अडचणी येतात. या अडचणींना तोंड देत कार्य करावे लागते. अशावेळी अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय घाडगे यांनी केली. पोलीस पाटील मुसळे यांनी महिला पोलीस पाटलांच्या अडचणी यावेळी मांडल्या. काटोल विभागातील १३६ पोलीस पाटील या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित होते. शिबिरात काटोल, नरखेड, कोंढाळी, जलालखेडा परिसरातील उत्कृष्ट पोलीस पाटील व पोलीस विभागाला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मोहन चौधरी, कांचन राठोड, विलास चालखोर, वैष्णवी कवडसे, तेजस फंदी, पुष्पा घोडमारे, संजय नागपुरे आदी पोलीस पाटलांचा समावेश आहे. यासोबतच रमेश पातुरकर, महेश लांबोळी, संजय गायकवाड या पोलीस मित्रांचाही सत्कार करण्यात आला. संचालन व आभार संतोष निंभोरकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील कोकाटे, चेतन ठाकरे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.