कस्तूरचंद पार्कवर होणार महाराष्ट्र दिनाचा मुख्य कार्यक्रम

By Admin | Updated: April 29, 2016 02:58 IST2016-04-29T02:58:39+5:302016-04-29T02:58:39+5:30

महाराष्ट्र दिनाचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम १ मे रोजी कस्तूरचंद पार्क येथे होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

The main event of the Maharashtra Day will be on Kastoorchand Park | कस्तूरचंद पार्कवर होणार महाराष्ट्र दिनाचा मुख्य कार्यक्रम

कस्तूरचंद पार्कवर होणार महाराष्ट्र दिनाचा मुख्य कार्यक्रम

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण : अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
नागपूर : महाराष्ट्र दिनाचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम १ मे रोजी कस्तूरचंद पार्क येथे होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. या कार्यक्रमासंदर्भात गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेण्यात आला.
ज्या ज्या विभागांवर कामाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांनी योग्य नियोजन करून आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत उपायुक्त (सामान्य प्रशासन) आप्पासाहेब धुळाज यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वतयारीबाबत उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. येत्या १ मे रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र दिनाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क येथे होईल. त्यामुळे सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेमध्ये कोणत्याही शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येऊ नये, अशा सूचनाही प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमस्थळी ज्या विभागातील व्यक्तींना पुरस्कार द्यायचे आहेत, त्यांची नावे ३० एप्रिलपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्याकडे द्यावी. ऐनवेळी नावे स्वीकारल्या जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती आप्पासाहेब धुळाज यांनी यावेळी दिली. यावेळी आसन व्यवस्था, परिवहन, विद्युत ध्वनिक्षेपण व्यवस्था, स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार, कार्यक्रमाची प्रसिद्धी आदीबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी, विशेष पोलीस शाखा होमगार्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, अन्नधान्य वितरण अधिकारी, वने व उद्याने उपविभाग, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, अग्निशमन, विद्युत विभाग, ११८ टी.ऐ. बटालियन प्रादेशिक सेना, शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The main event of the Maharashtra Day will be on Kastoorchand Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.