महावितरणला शॉक !
By Admin | Updated: June 23, 2014 01:28 IST2014-06-23T01:28:40+5:302014-06-23T01:28:40+5:30
रिकाम्या प्लॉटवरील विद्युत पोल आणि विजेच्या तारा हटविण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत दोन लाचखोर अधिकाऱ्यांना

महावितरणला शॉक !
एसीबीची कारवाई : दोन लाचखोर अधिकारी अटकेत
नागपूर : रिकाम्या प्लॉटवरील विद्युत पोल आणि विजेच्या तारा हटविण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रविवारी रंगेहात अटक केली.
सुशील गिरीशराव सहस्रबुद्धे (३२) आणि राजकुमार नारायणराव गजभिये (४०) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. सहस्रबुद्धे हे नरखेड येथे कनिष्ठ अभियंता तर गजभिये हे मानकापूर येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत.
तक्रारकर्त्याच्या नावावर मौजा बोखारा, रामनगर वॉर्ड नं. १ मॉडर्न स्कूल येथे रिकामे प्लॉट आहे. त्यांच्या या प्लॉटवर महावितरण कंपनीचा इलेक्ट्रीक पोल आहे. तसेच प्लॉटच्या मधोमध वीज वाहून नेणाऱ्या तारा गेल्या आहेत. त्यांना प्लॉटवर घराचे बांधकाम करायचे आहे. अशा परिस्थितीत बांधकाम करताना धोका होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी विद्युत पोल व तारा हटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कंपनीच्या मानकापूर येथील विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांकडे रीतसर अर्ज केला. सदर अर्जाची एक प्रत कनिष्ठ अभियंता मानकापूर यांच्याकडेही देण्यात आली. कनिष्ठ अभियंता सुशील सहस्रबुद्धे यांनी तक्रारकर्त्याशी संपर्क साधला आणि सांगितले की, मानकापूर येथील कनिष्ठ अभियंता राजकुमार गजभिये यांना सांगून आपण प्लॉटवरील विद्युत पोल व तारा हटवू शकतो. परंतु यासाठी १५ हजार रुपये लागतील. यासाठी इतका शासकीय खर्च येत नसल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले. यावर सहस्रबुद्धे म्हणाले की दोन हजार रुपये शासकीय खर्च येतो. उर्वरित माझा व गजभिये यांचा वाटा आहे. तुम्ही आधी ५ हजार रुपये द्या. तुमच्या कामाचा प्रस्ताव तयार करून मी कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवितो. तुमचे काम झाल्यावर उर्वरित १० हजार रुपये द्या, असा प्रस्तावही सहस्रबुद्धे यांनी ठेवला. गजभिये यांच्याकडून काम करवून घेण्याची जबाबदारी माझी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर गजभिये यांच्याशी भेट घालून देतो तेव्हा त्यांच्याशीच तुम्ही देवाण-घेवाणीचे थेट बोला असेही सांगितले.
तक्रारकर्त्यास लाच द्यायची नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. ठरल्यानुसार रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास संविधान चौकात भेटण्याचे निश्चित झाले. तक्रारकर्त्याकडून संविधान चौकात पाच हजाराची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता सुशील सहस्रबुद्धे आणि राजकुमार गजभिये यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. अॅण्टी करप्शन ब्युरो नागपूरचे पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, हवालदार ब्रिजकिशोर तिवारी, पोलीस नायक राजेंद्र शेंदे, योगेश उईके, महिला पोलीस तनुजा मेश्राम, चालक देवानंद मारबते यांनी ही कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)