पारशिवनी तालुक्यात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:06+5:302021-01-19T04:10:06+5:30
विजय भुते लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तालुक्यात चारपैकी तीन जिल्हा परिषद सर्कल आणि आठपैकी सहा पंचायत समिती सर्कल ...

पारशिवनी तालुक्यात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
विजय भुते
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यात चारपैकी तीन जिल्हा परिषद सर्कल आणि आठपैकी सहा पंचायत समिती सर्कल काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. त्यातच तालुक्यात १० ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी समर्थित गटांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष समर्थित गटाला एकाही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविता न आल्याने यावेळी त्यांचे सुपडे साफ झाले आहे.
बाभूळवाडा येथे महाविकास आघाडीतील काॅंग्रेस समर्थित इंद्रपाल गाेरले गटाला चार व शिवसेना समर्थित गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. पिपळा येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रावादी काॅंग्रेस समर्थित सचिन आमले व काॅंग्रेस समर्थित गाैतम गजभिये यांच्या गटाने पाच, तर प्रहार समर्थित गटाने दाेन जागा जिंकल्या आहेत. नवेगाव (खैरी) येथे काॅंग्रेस समर्थित कमलाकर काेठेकर यांच्या गटाला सहा जागा जिंकणे शक्य झाले असून, येथे शिवसेना समर्थकांनी काॅंग्रेसला भरपूर सहकार्य केले.
सुवरधरा येथे महाविकास आघाडीतील शिवसेना समर्थित गटाने चार, काॅंग्रेस समर्थित गटाने दाेन जागा जिंकून सत्ता मिळविली. इटगाव येथे महाविकास आघाडी समर्थित गटाने सहा जागा जिंकून ग्रामपंचायतवर सत्ता प्रस्थापित केली, तर इतरांच्या वाट्याला दाेन जागा गेल्या आहेत. निमखेडा येथे काॅंग्रेस समर्थित गटाने पाच जागा जिंकून ग्रामपंचायतची सत्ता भाजप समर्थित गटाकडून हिसकावून घेतली. खेडी येथे काॅंग्रेस समर्थित गटाला सहा जागा मिळाल्या असून, भाजप समर्थित गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. बाेरी (सिंगारदीप) येथे मतदारांनी सर्व जागा महाविकास आघाडीच्या झाेळीत टाकल्या असून, खंडाळा येथे युवक काॅंग्रेसचे रामटेक विधानसभा अध्यक्ष निखील पाटील व शिवसेनेच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे.
...
एकाेप्यामुळे मतांची विभागणी टळली
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काॅंग्रेसमधील पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक व चंद्रपाल चाैकसे, शिवसेनेचे आ. आशिष जयस्वाल आणि प्रहारच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये एकाेपा दिसून आला. त्यामुळे मतांची विभागणी टळल्याने काही अपवादात्मक उमेदवार वगळता महाविकास आघाडीला भरीव यश संपादन करणे शक्य झाले. मतांची विभागणी न झाल्याने भाजप समर्थित गटांना यश मिळविणे शक्य झाले नाही.
....
माहुली येथे भरीव यश
भाजप समर्थित गटाने तालुक्यातील खेडी, नवेगाव (खैरी), निमखेडा व माहुली या चार ग्रामपंचायतींमध्ये खाते उघडले असून, निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्याही नगण्य आहे. माहुली हे गाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची कर्मभूमी राहिली आहे. येथे भाजप समर्थित गटाला केवळ दाेन जागांवर समाधान मानावे लागले असून, महाविकास आघाडी समर्थित गटाने आठ तर प्रहारने एक जागा जिंकली आहे.