महात्मा गांधींनी राष्ट्रीय चेतना जागविली
By Admin | Updated: January 2, 2015 00:52 IST2015-01-02T00:52:04+5:302015-01-02T00:52:04+5:30
महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधींनी राष्ट्रीय चेतना जागविली
राम पुनियानी : ‘महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचा भारत’ यावर परिसंवाद
नागपूर : महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले.
नागपूर जिल्हा सर्वोदय मंडळतर्फे गुरुवारी झाशी राणी चौकातील हिंदी मोर भवन येथे ‘महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचा भारत’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पुनियानी यांनी महात्मा गांधी यांचे विचार आणि देशाच्या ऐतिहासिक व वर्तमान परिस्थितीवर सखोल मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक दत्तात्रय बरगी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात इंग्रजांसोबत सामाजिक बदल, तर महात्मा गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादाचे आगमन झाले. इंग्रजकाळात उद्योजक, कामगार व सुशिक्षित वर्ग उदयास येऊन राजा, जमीनदार आदींची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राजे-जमीनदारांनी स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी धर्माचा प्रचार सुरू केला. त्यावेळी हिंदू व मुस्लीम राजे सोबत होते. इंग्रजांनी त्यांच्यात दुही निर्माण केल्यानंतर धार्मिक संघटना तयार झाल्या. महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही संघटना होत्या, पण त्यात राष्ट्रीयत्वाची भावना होती. राजा हिंदू असो वा मुस्लीम शोषण, जाती व्यवस्था व लिंगाच्या आधारावर भेदभाव कायम होता. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय चेतना जागविण्याचे कार्य केले, असे पुनियानी यांनी सांगितले.
१९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा उच्चवर्गापर्यंत सीमित होता. महात्मा गांधी यांनी हा लढा तळागाळापर्यंत पोहोचविला. महात्मा गांधींवर मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप केला जातो. परंतु, राष्ट्रीयत्वाच्या विचारापुढे धार्मिक बंधनांना कधीच महत्त्व नसते. महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, साने गुरुजी आदी महापुरुष धर्माच्या नाही, तर धार्मिक मूल्यांच्या आधारावर जगत होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी इस्लाम जोडणे शिकवितो तोडणे नाही, असे सांगून ठेवले आहे. साने गुरुजी यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ म्हटले आहे, अशी माहिती पुनियानी यांनी दिली. मंडळाचे सचिव रवी गुडधे यांनी संचालन केले.
नथुराम गोडसेचा उदोउदो थांबवा
महात्मा गांधी यांची शरीराने हत्या झाली आहे, पण त्यांच्या विचारांची हत्या होऊ नये यासाठी नथुराम गोडसेचा उदोउदो थांबला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदू महासभेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलो, असे गोडसेने न्यायालयात सांगितले होते. परंतु, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या काळातही तो संघात सक्रिय होता याचे पुरावे आहेत.(प्रतिनिधी)