महाराष्ट्र सुसंस्कृत करण्याचे स्वप्न
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:44:20+5:302014-10-29T00:44:20+5:30
स्वाभाविकपणे मुलाच्या देदीप्यमान यशाने कुठलीही माता हुरळून जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा देवेंद्र यांची माता सरिता करीत होत्या.

महाराष्ट्र सुसंस्कृत करण्याचे स्वप्न
आई सरिता फडणवीस यांना विश्वास
नागपूर : स्वाभाविकपणे मुलाच्या देदीप्यमान यशाने कुठलीही माता हुरळून जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा देवेंद्र यांची माता सरिता करीत होत्या.
सातत्याने त्या दूरचित्रवाहिनीसमोर बसून होत्या. घरात कार्यकर्त्यांची गर्दी आणि बाहेर जल्लोषाचे वातावरण. त्यामुळे सरिता फडणवीस शांतपणे त्यांच्या बेडरूममध्ये टीव्हीसमोर होत्या. देवेंद्र यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे शांत स्मितहास्य उमटले. आत्ता या क्षणाला आई म्हणून काय वाटतंय? असे विचारले असता त्या म्हणाल्या, देवेंद्रने महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त, महिलांना सुरक्षितता प्रदान करणारा आणि सुसंस्कृत करावा. सत्ता केवळ सेवेसाठी असते, हाच त्याचा संस्कार आहे, त्यामुळे त्याच्याकडून मलाही खूप अपेक्षा आहे. सामान्य आणि तळागाळातल्या माणसाचे जगणे त्याने सुसह्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज गंगाधरराव असते तर...असे विचारले असता त्यांनी गंगाधरराव असते तर देवेंद्र राजकारणात आलाच नसता, असे सांगितले.
पण वडील गेल्यावर तो राजकारणात आला, कारण त्याने वडिलांचे काम अनुभवले होते. हे काम आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो राजकारणात आला. एकदा गंगाधरराव विमानाने मुंबईला गेले त्यावेळी देवेंद्रला खूप आकर्षण वाटले.
आयुष्यात कधी विमानात बसायला मिळेल, असे वाटत नाही, असे तो त्यावेळी बोलला होता. पण आज देवेंद्र रोज विमानानेच मुंबईला जातो, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
पायनॅपल आईसगोला खाणारा मुख्यमंत्री
शाळेत असताना आम्ही सारेच सरस्वती हायस्कूलमध्ये बसने जायचो. पण आम्हाला आईसगोला खूप आवडायचा. त्यामुळे आम्ही बसचे पैसे वाचवून पायी जायचो आणि आईसगोला खायचो. देवेंद्रला त्यावेळी पायनॅपल आईसगोला खूप आवडायचा. आत्ताही आवडतो. फक्त प्रकृतीमुळे आता अम्हाला खाणे जमत नाही; पण देवेंद्रला आईसगोला अजूनही आवडतो, अशी आठवण यावेळी कुणाल एकबोटे यांनी सांगितली.