महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर घसरला

By Admin | Updated: November 7, 2015 03:19 IST2015-11-07T03:19:22+5:302015-11-07T03:19:22+5:30

आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र आता गुजरातचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रात येत आहेत...

Maharashtra slipped to eighth position | महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर घसरला

महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर घसरला

अशोक चव्हाण यांची टीका : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चा
नागपूर : आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र आता गुजरातचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रात येत आहेत व महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी परदेश दौरे करीत आहेत. मात्र, त्यानंतरही वर्षभरात महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होऊन महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. या संबंधातील शासकीय आकडेवारी समोर आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
काँग्रेसची विदर्भस्तरीय बैठक शुक्रवारी नागपुरात पार पडली. यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात फक्त मोठ्या घोषणा होत आहेत, काम नाही. महागाईचा भडका उडाला आहे. तूर डाळीचे भाव २०० रुपयांच्या वर गेले आहेत.
दुसरीकडे भाजपची डाळ १०० रुपये तर शिवसेनेची डाळ १२० रुपयांना विकल्या जात आहे. महागाईतही यांची स्पर्धा सुरू आहे. धाडी घालून जप्त केलेली डाळ रेशनच्या दुकानातून विकण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच परत केली जात आहे. काँग्रेसच्या काळात साठेबाजीवर नियंत्रण होते. मात्र, भाजप सरकारने साठवणुकीची मर्यादा काढून घेतली.
त्यामुळे साठेबाजी वाढून डाळींची भाववाढ झाली, असा आरोप करीत आता धाडी घालून पकडलेली डाळ भाजपचे अध्यक्ष विकत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती गुन्हेगारी आदी प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ७ डिसेंबर रोजी विधान भवनावर काँग्रेसतर्फे मोर्चा काढला जाईल. तसेच दोन्ही सभागृहातही काँग्रेस नेते सरकारला जाब विचारतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉन छोटा राजन याने मुंबई पोलिसात दाऊदचे हस्तक असल्याबाबत केलेल्या आरोपांची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करावी, असे सांगतानाच एका गुन्हेगाराचे आरोप कितपत गांभीर्याने घ्यायचे यावरही विचार व्हावा, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. बारामतीला भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटींबाबत विचारणा केली असता नांदेडला अद्याप कुणी आलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. मराठवाड्याला पाणी सोडण्याचा प्रश्न समन्वयातून सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, वीरेंद्र जगताप, नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कापसाला आठ हजार भाव द्या
भाजपने जाहीरनाम्यात कापसाला ६ हजार रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, हमीभावात फक्त ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून ४ हजार ५० रुपये भाव दिला जात आहे. अद्याप पुरेशी खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत, असे सांगून कापसाला ८००० रुपये भाव देण्याची मागणी चव्हाण यांनी केली. विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे यांनी केलेली बोनसची मागणी आता पूर्ण करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
गेम चेंजर नाही, नेम चेंजर
राज्य सरकारने आघाडी सरकारच्या योजनांची फक्त नावे बदलली आहेत. हे सरकार गेम चेंजर नसून नेम चेंजर आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. पाणी अडवा पाणी जिरवा आमचीच योजना होती. यांनी जलयुक्त शिवार नाव दिले. या योजनेचे २४ दलघमी पाणी नेमके कुठे अडविले त्या गावांची यादी सादर करा, अशी मागणी करीत पाणी वाढले तर ६५३ गावांमध्ये टँकर कसे सुरू आहेत, असा सवाल विखे पाटील यांनी केला. दुष्काळी भागात कर्जमाफी करण्याची सरकारची तयारी नाही. मात्र, सावकारांची कर्जमाफी केली. नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ झाले याची यादी आठ महिन्यांपासून मागणी करूनही देण्यात आलेली नाही. हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूर हे क्राईम कॅपिटल झाले असून भाजप पदाधिकारी मुन्ना यादव यांच्यासारख्या नेत्यांची यादवी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Maharashtra slipped to eighth position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.