लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही किरकोळ घटना वगळल्यास मतदान सुरळीत पार पडले. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल.
मोबाईलवर बंदीमतमोजणीच्या ठिकाणी मोबाईलला बंदी राहील. केवळ निवडणूक निर्णय अधिकारी सोडले तर कुणालाही मोबाईल आत नेता येणार नाही. प्रसिद्धी माध्यमांनासुद्धा मोबाईल केवळ प्रसिद्धीमाध्यम कक्षापर्यंतच वापरण्याची परवानगीही राहील, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा :१२ ठिकाणी स्ट्राँग रुम : सीसीटीव्ही कॅमेरे
प्रत्येक मतदार संघातील ईव्हीएम संबंधित मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघापैकी शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा मतदार संघ आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी स्वतंत्र मतमोजणीची व्यवस्था आहे. तसेच मतमोजणीस्थळाजवळच स्वतंत्रपणे स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर सर्व केंद्रावरील ईव्हीएम तेथे सील करून ठेवण्यात आल्या. यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखील दल आणि स्थानिक पोलीस अशी ही त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. सर्वात बाहेर हे स्थानिक पोलीस आहेत, तर आतमध्ये राखीव दलाची सुरक्षा आहे. त्यांचा २४ तास खडा पहारा आहे. मतमोजणीनंतर शहरातील सर्व मतदार संघातील ईव्हीएम या कळमना येथे सुरक्षित ठेवल्या जातील, तर ग्रामीणमधील त्या त्या ठिकाणी राहील.