महाआरोग्य शिबिराला महाप्रतिसाद

By Admin | Updated: June 19, 2016 02:44 IST2016-06-19T02:44:23+5:302016-06-19T02:44:23+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी महिला आणि मुलांसाठी आयोजित...

Mahaprashadas of the major health camp | महाआरोग्य शिबिराला महाप्रतिसाद

महाआरोग्य शिबिराला महाप्रतिसाद

नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी महिला आणि मुलांसाठी आयोजित नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकमत आणि जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. दंदे फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात ८३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात गर्भाशयापासून ते मूतखड्याच्या आजाराचे ६१ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंद झाली. इतर रुग्णांच्या आजाराचे निदान करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याच्या या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
बुटीबोरी येथील श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर सेंटर, जैन सहेली मंडळाच्या सभागृहात आयोजित या शिबिराचे सकाळी उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडावाला, लोकमतच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे व जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधुरी बोरा उपस्थित होत्या.

आरोग्य क्षेत्रामधील राजकारण संपायला हवे
एखादे देऊळ बांधण्यापेक्षा एका रुग्णाची सेवा करणे ही ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे. ग्रामीण भागात अनेक डॉक्टर सेवाभावीवृत्तीने काम करीत आहेत. डॉ. मुफज्जल लाकडावाला, डॉ. पिनाक दंदे त्यातीलच एक आहेत. यासोबतच डॉ. संजय दर्डा आणि डॉ. अनिता दर्डा हे आठवड्यातून एक दिवस स्वत:च्या खर्चाने ग्रामीण भागात जाऊन आपली सेवा देत आहेत. डॉ. विनोद बोरा शहरात आपला व्यवसाय न थाटता मध्य प्रदेशातील दुर्गम भागात आपली सेवा देत आहेत. जिथे बैलगाडी जात नाही तिथे ते सायकलने पोहचून महिलांवर, गर्भवतींवर उपचार करीत आहेत. हा आमच्या समाजासाठी आदर्श आहे. आज सरकार लोकांच्या आरोग्यासाठी विविध योजना चालवीत आहेत. परंतु एम्स (आयुर्विज्ञान संस्था) आणि एमसीआय (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया) सारख्या संस्थेमध्ये राजकारण चालविले जात आहे. जर देशात आरोग्य सेवेचा दर्जा वाढवायचा असेल तर अशा संस्था राजकारणमुक्त करणे आवश्यक आहे. शासकीय इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांसाठी महागडी उपकरणे लावण्यात आली आहेत. परंतु रुग्ण शस्त्रक्रियेसाठी गेला असता याच मशिनी बंद पडतात. त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी इस्पितळात जावे लागते. आरोग्य क्षेत्रात या समस्यांच्या निराकरणासाठी कुणाला तरी जबाबदार ठरविणे आवश्यक आहे.
- खा.विजय दर्डा, लोकमतच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन

ग्रामीण भागात कीव आणणारी आरोग्य सेवा
ग्रामीण भागात आरोग्य सेवेची स्थिती फारशी चांगली नाही. एका गरीब कुटुंबात जर कुणी आजारी पडले तर त्याच्या उपचाराला घेऊन ते कुटुंबच अडचणीत येते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांमध्ये आरोग्य सेवा न मिळणे हेही एक कारण आहे. ग्रामीण रुग्णालयात कधी डॉक्टर राहतो तर परिचारिका राहत नाही आणि दोन्ही मिळाल्यास औषधे राहत नाही, अशी बिकट स्थिती आहे. माझी विनंती आहे की, डॉक्टरांनी १०० रुग्णांमधून कमीतकमी १० टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार करावेत. दर महिन्याला वेगवेगळ्या तहसीलमध्ये असे आरोग्य शिबिर आयोजित केल्यास याचा मोठा फायदा रुग्णांना होईल. लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांनी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागळातील महिलांना मदत करीत त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
- कृपाल तुमाने ,खासदार, रामटेक

जिल्हा रुग्णालयात मिळणार कर्करोगावर उपचार
नॉन कम्युनीकेबल डिसीज मध्ये कर्करोगाचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात टाटा मेमोरिअल कॅन्सर इन्स्टिट्यूटसोबत नुकतीच बैठक झाली. या इन्स्टिट्यूटमधून पास झालेल्या डॉक्टरांच्या मदतीने ३४ जिल्ह्यात त्यांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येकाकडे एक-एक जिल्ह्याचा भार सोपविण्यात येईल. नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे शैलेश जोगळेकर व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आनंद पाठक यांच्या मदतीने डॉक्टर व परिचारिकांना कॅन्सरवरील उपचाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आता गडचिरोली, गोंदियासह सहा जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना केमोथेरपी घेण्यासाठी नागपुरात येण्याची गरज भासणार नाही. या शिबिरात आजाराचे निदान झालेल्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मदत करेल.
- डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

शिबिराची खरी गरज ग्रामीण भागातच
आरोग्य शिबिराची खरी गरज ग्रामीण भागातच आहे. यातच महिला आणि लहान मुलांसाठी घेतलेले हे आरोग्य शिबिर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. असेच शिबिर मेळघाट व दुर्गम भागात घेतल्यास मी स्वत:हून मदत करेल.
डॉ. मुफज्जल लाकडावाला , प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन
उल्लेखनीय कार्यक्रमांचे आयोजन
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी उल्लेखनीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या अशा शिबिरांमुळे रुग्णांना मोठा फायदा मिळतो. या शिबिरात केंद्र सरकारच्या योजनेमधून ग्रामीण भागातील अपंग लोकांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न व्हायला हवा.
अनिल देशमुख , माजी मंत्री, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष
दुर्बल, गरीब रुग्णांची सेवा घडते
अशा शिबिरांमधून दुर्बल, गरीब रुग्णांची सेवा होत असल्याने यातून मिळणाऱ्या आनंदाला मोल नाही. अशा शिबिराच्या माध्यमातून गंभीर आजाराचे पूर्वीच निदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्णाला पुढील धोक्यापासून वाचविणे शक्य होईल.
डॉ. पिनाक दंदे

Web Title: Mahaprashadas of the major health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.