‘त्या’ स्मृतींनी आजही येतात शहारे
By Admin | Updated: July 30, 2015 03:16 IST2015-07-30T03:16:56+5:302015-07-30T03:16:56+5:30
महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही.

‘त्या’ स्मृतींनी आजही येतात शहारे
मोवाड महापुराला २४ वर्षे : २०४ गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी
अविनाश गजभिये मोवाड
महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही. महापुराला दोन तपांचा कालावधी लोटला असला तरी महापुराच्या धक्क्यातून अद्यापही मोवाडवासी सावरलेले नाही. आजही या घटनेची आठवण काढताच तडाखा सहन केलेल्या नागरिकांच्या अंगावर शहारे येतात.
मोवाडसाठी ३० जुलै १९९१ हा ‘काळा दिवस’च ठरला. महापुराने २०४ निरपराध लोकांना जलसमाधी मिळाली. ती रात्र सर्वांसाठी वैऱ्याचीच ठरली. मृतदेहांचा सडा दोन ते तीन किमीपर्यंत पसरला होता. यात उरली फक्त काही देवांची मंदिरे. महापुराची बातमी सर्वत्र पसरताच शेकडो हात मदतीसाठी धावले. मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन कायद्यातील कलम आणि पोटकलमात हे गाव हरविले आहे.
पूरग्रस्तांना २५ हजार रुपये आणि तीन हजार चौरस फूट जागा दिली. मोवाड येथील शेतकऱ्यांकडे पुरापूर्वी जवळपास १ हजार ६५० एकर शेती होती. पुरात ६५० एकर शेती खरडल्या गेली ती आता पडिक आहे. ३५० एकरमध्ये गावाचे पुनर्वसन करण्यात आले. ३५० एकर शेती रेल्वेमार्गात गेली. आता उरल्या शेतीवर गुजराण करावी लागते. महाराष्ट्राच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या या गावासाठी वर्धा नदी जीवनदायी अशीच होती.
या नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होत असल्याने उत्पन्नात भर पडून शेतकरीही सधन झाले होते. येथे मोठी बाजारपेठही होती परंतु, ३० जुलै १९९१ च्या रात्री याच वर्धा नदीने अख्ख्या मोवाडवासीयांचे संसार विस्कळीत केले. त्यामुळे महापुरापूर्वीचे जमीनदार आता शेतमजूर म्हणून काम करीत आहेत.
बाहेरगावाहून शेतमजूर येणाऱ्या मोवाडचे चित्र पालटून आता या गावातील नागरिक १५ ते २० किमीपर्यंतच्या पट्ट्यात बाहेरगावी कामाला जातात, हे येथील वास्तव आहे. लोकसंख्या तेव्हा १० हजारांपेक्षा अधिक होती.
आता केवळ ८ हजार ५०० आहे. दरवर्षी ३० जुलैला मोवाडवासी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असून, जलसमाधी मिळालेल्या २०४ गावकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. यासाठी मोठमोठे नेते येतात आणि आश्वासने देत जखमांवर मीठ चोळण्याचेच काम करून जातात. मोवाडवासीयांवर असलेले कर्ज माफ, तरुणांच्या हाताला काम देण्याची घोषणा करतात.
परंतु, या घोषणा क्षणातच हवेत विरतात. परत पुढील वर्षी हेच नेते ‘मागच्या पानावरून पुढे’ असा पाढा वाचतात. काही दिवसांपूर्वी मोवाडवासीयांना थोडा दिलासा मिळाला. यापुढे त्यांना त्यांच्या घरावर कर्ज मिळणे शक्य होणार आहे. किमान त्या आधारे जीवनमान सुधारण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.