आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. कमीत कमी निविष्ठांसह विविध हंगाम व भौगोलिक परिस्थितीत घेता येणारे पीक म्हणून ज्वारी प्रसिद्ध आहे. या पिकाची अधिक उत्पादन क्षमता वाढवावी या हेतूने अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत आहे. यातच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चे संशोधक डॉ. गजानन हनुमंतराव नाईक यांनी पिवळी ज्वारी अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारे प्रोजेनीस शोधले आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत डॉ. नाईक यांचा पीएचडीचा विषय ‘स्टडी ऑन इंड्यूज्ड म्युटेशन इन येलो पेरिकार्प सोरघम (सोरघम बाइकलर एल. मोन्च)’ असा होता. डॉ. नाईक यांनी कृषि वनस्पती विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. एच. व्ही. काळपांडे यांच्या मार्गदर्शनात आपला शोधप्रबंध तीन वर्षात यशस्वी पूर्ण केला. ‘महाज्योती’च्या नागपुरच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी संस्थेचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांच्या हस्ते डॉ. गजानन नाईक यांना मेडल आणि सन्मान वस्त्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखाधिकारी रश्मी तेलेवार यांची उपस्थिती होती.
डॉ. नाईक यांनी पिवळी ज्वारी या पिकामध्ये अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता तयार करण्याचे वाण तयार करण्याचे शोध प्रबंध तयार केले. या प्रयोगासाठी त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या साह्याने किरणोत्सार तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिवळ्या ज्वारीमध्ये जनुकीय बदल घडवले. या बदलातून अधिक उत्पादनक्षम, दुष्काळ सदृश्य परिस्थितीत तग धरू शकणारे आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असलेले काही प्रोजेनीज शोधले आहेत. यामधून भविष्यात पिवळ्या ज्वारीचा अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारा वाण विकसित होईल. तसेच शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल असे मनोगत डॉ. नाईक यांनी व्यक्त केले.
देशासह राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदामहाज्योतीचे संशोधक डॉ. गजानन नाईक यांनी केलेले संशोधन कौतुकास्पद असून आपल्या कृषी प्रधान असलेल्या भारताला प्रगती पथावर नक्की नेणारा ठरेल..
- अतुल सावे, महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री