महाजनको-वेकोलि चार कोलवॉशरी तयार करणार
By Admin | Updated: March 2, 2016 03:16 IST2016-03-02T03:16:09+5:302016-03-02T03:16:09+5:30
वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजनको आणि वेकोलि संयुक्तपणे चार कोलवॉशरी महाराष्ट्रात तयार करणार असून,

महाजनको-वेकोलि चार कोलवॉशरी तयार करणार
बैठकीत निर्णय : ऊर्जामंत्र्यांनी दिली माहिती
नागपूर : वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महाजनको आणि वेकोलि संयुक्तपणे चार कोलवॉशरी महाराष्ट्रात तयार करणार असून, पुढील दीड वर्षांत या दोन्ही वॉशरी सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
वेकोलिचा कोळसा खरेदी केल्यास महाजनकोला ४२१ कोटींचा फायदा होणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. महाजनको आणि वेस्टर्न कोलफील्ड या दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २९ फेब्रुवारी रोजी वेकोलिच्या मुख्यालयात झाली. दोन्ही संस्थांच्या कामात व अधिकाऱ्यांमध्ये काम करताना समन्वय राखण्यासाठी व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे परिणाम वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चात कपात होण्यात होणार आहे. परिणामी वीजदर कमी करण्यासही या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेकोलिची वाटचाल तोट्याकडून नफ्याकडे होत असल्याचे यावेळी वेकोलिचे प्रबंध संचालक व अध्यक्ष राजीव रंजन मिश्र यांनी सादरीकरणातून सांगितले. दरम्यान, त्यांनी महाजनकोला वेकोलि नागपूरचा कोळसा कसा परवडतो व किती फायदा महाजनकोला होणार आहे, हे प्रत्यक्षपणे समोर मांडले. सोबतच वेकोलि आणि महाजनको यांनी संयुक्तपणे कोलवॉशरी निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात खर्च कपात होणार आहे. याशिवाय कोळसा योग्य पद्घतीने ‘वॉश’ करून मिळणार आहे. दीडशे कोटी महाजनको व दीडशे कोटी वेकोलि अशा समान खर्चात ही वॉशरी उभी होणार आहे. विदर्भातील वीजनिर्मिती प्रकल्पांना लागणारा संपूर्ण कोळसा वेकोलि पुरविण्यास तयार असल्याचे सीएमडी आर.आर. मिश्र यांनी यावेळी सांगितले. वेकोलिचा कोळसा घेतला तर महाजनकोला दरवर्षी ४२१ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. तसेच यंदा ३० दशलक्ष टन कोळसा पुरविण्याची आमची तयारी असून, दरवर्षी ५ दशलक्ष टन कोळसा अधिक पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानदी खदानीतून कोळसा खरेदी बंद करून वेकोलिचा कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महानदी खदानीतून आणल्या जाणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात कपात केली जाणार आहे. तसेच चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी या वीजनिर्मिती केंद्रांना बेल्टवर कोळसा पुरवठा करा. यासाठी लागणारे तीन बेल्ट सहा महिन्यात तयार करण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच नागपूर नजीकच्या महाजनकोच्या सर्व वीजनिर्मिती केंद्रांना वेकोलिकडे उपलब्ध असलेले पाणी नि:शुल्क देण्यास वेकोलिने होकार दिला आहे. नागपूर विभागात वेकोलिकडे ६ कोटी गॅलन पाणी दररोज उपलब्ध असते. आगामी काळात पेंचचे पाणी बंद होण्याची शक्यता लक्षात घेता, वेकोलिचे नि:शुल्क मिळणारे पाणी वापरण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी केल्या. खापरखेडा केंद्राला बिनातून आणि भानेगाव शिंगोरी येथील पाणीही वीजनिर्मितीसाठी वापरण्यास सांगण्यात आले. चंद्रपूर, खापरखेडा आणि कोराडी या तिन्ही केंद्रांना वेकोलि आपले पाणी देणार आहे. (प्रतिनिधी)
दोन समित्या गठित होणार
कोळसा वाहतुकीत होणारा तोटा आणि कोळशाचा स्तर तपासणीसाठी दोन समित्या गठित होणार आहे. या दोन्ही समित्यांमध्ये महाजनको आणि वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी राहतील. वाहतुकीत होणाऱ्या तोट्यासंदर्भातील समिती एक महिन्यात आपला अहवाल सादर करेल. तर कोळशाच्या स्तरासंदर्भातील समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल असा यावेळी निर्णय घेण्यात आला. या दोन्ही शासकीय विभागांच्या सकारात्मक समन्वयासाठी झालेल्या बैठकीत महाजनकोचे प्रबंध संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक विजय सिंग, कार्यकारी संचालक कोळसा विकास जयदेव, मुख्य अभियंता सीताराम जाधव, उपसंचालक कोळसा अरविंद चंद्रागडे, राहाटे तर, वेकोलिकडून प्रबंध संचालक राजीव रंजन मिश्र, तांत्रिक संचालक एस. एस. मल्ही, बी. के. मिश्रा, महाव्यवस्थापक (वित्त) पी. व्ही. भट्टड, महाव्यवस्थापक (विक्री) आर. डी. रॉय, आर. जी. सुवर्णकार प्रामुख्याने उपस्थित होते.