महाबोधी मुक्ती आंदोलन आता आणखी जोमाने
By Admin | Updated: August 25, 2014 01:17 IST2014-08-25T01:17:03+5:302014-08-25T01:17:03+5:30
आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे प्रकृती सुधारली आहे. आता पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करीत आहोत. येत्या १९ सप्टेंबरपासून हे आंदोलन आणखी जोमाने पुढे नेण्यात येईल, अशी ग्वाही

महाबोधी मुक्ती आंदोलन आता आणखी जोमाने
भदंत सुरई ससाई : राज्य शासनाचे मानले आभार
नागपूर : आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे प्रकृती सुधारली आहे. आता पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करीत आहोत. येत्या १९ सप्टेंबरपासून हे आंदोलन आणखी जोमाने पुढे नेण्यात येईल, अशी ग्वाही बौद्ध धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
मागील दोन महिन्यांपासून भदंत ससाई यांची प्रकृती ढासळली होती. त्यांना पूर्वी केअर इस्पितळ आणि नंतर मुंबई येथील इस्पितळात भरती करण्यात आले होते. यावेळी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी ही पत्रपरिषद आयोजित केली होती. भदंत ससाई म्हणाले, इस्पितळात उपचार घेत असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी आस्थेने चौकशी केली. नितीन राऊत यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने उपचाराचा खर्च उचलला. यामुळे एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत जाऊन उपचार घेता आले. अंथरुणावर खिळलो होतो, त्यावेळी विजय मेश्राम, डॉ. एस.के.गजभिये, अमित गडपायले, गौतम अंबादे, जगन तायडे, भन्ते धम्मबोधी यांनी सेवा केली. केअर इस्पितळातील डॉक्टरांसह इतर सर्व डॉक्टरांनी प्रकृतीची विशेष काळजी घेतली. ज्यांनी माझ्यासाठी बुद्धवंदना केली त्या सर्वांचे आभार मानतो. विशेषत: राज्य शासनाला धन्यवाद देतो. आता प्रकृती सुधारली आहे. यामुळे पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यापासून हे आंदोलन आणखी जोमाने रेटण्याचा प्रयत्न राहील. पत्रपरिषदेत मेश्राम, गडपायले, डॉ. गजभिये, अंबादे, अशोक कोल्हटकर, संदीप कोचे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)