महाबोधी महाविहाराचा लढा पुन्हा जोमाने उभारणार
By Admin | Updated: August 31, 2014 01:15 IST2014-08-31T01:15:26+5:302014-08-31T01:15:26+5:30
आजारातून नुकताच बाहेर पडलो आहे. थोडा थकवा जाणवतोय, परंतु येत्या काही दिवसात आपण पूर्णपणे तंदुरुस्त होणार आणि या महिन्यातच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा पुन्हा एकदा

महाबोधी महाविहाराचा लढा पुन्हा जोमाने उभारणार
भंते ससाई यांचा विश्वास : वाढदिवसानिमित्त अनेकांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर : आजारातून नुकताच बाहेर पडलो आहे. थोडा थकवा जाणवतोय, परंतु येत्या काही दिवसात आपण पूर्णपणे तंदुरुस्त होणार आणि या महिन्यातच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करणार, असा विश्वास बौद्ध धम्मगुरु भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केला.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी भंते ससाई हे गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती बरी आहे. रुग्णालयातून त्यांना नुकतीच सुटी मिळाली आहे. भंते ससाई यांचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित न करण्याची त्यांनी विनंती केली होती. तरीही त्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी दूरवरून लोक आले होते. इंदोरा येथील बौद्ध विहारात त्यांची भेट घेण्यासाठी सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड येथूनही लोक आले होते. इतकेच नव्हे तर भंते ताकीयामा, भंते तेमोनो आणि उपासिका आकी या सुद्धा खास त्यांची भेट घेण्यासाठी जपानवरून आले होते.
दीक्षाभूमी येथे स्मारक समितीच्या बैठकीसाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता ते बोलत होते.
याप्रसंगी स्मारक समितीच्यावतीने सचिव सदानंद फुलझेले, रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विलास गजघाटे, एल.आर. सुटे आदी उपस्थित होते.
भंते ससाई यांनी बोलताना सांगितले की, महाबोधी महाविहार मुक्त होणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली जाईल. (प्रतिनिधी)