लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १८९१ मध्ये सर्वप्रथम आवाज उचलणारे अनागारिक धम्मपाल यांच्या जयंतीदिनी बुधवारी नागपुरात महाबोधी महाविहार मुक्तीचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. संविधान चौकात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते. यावेळी बिहार येथील बुद्धगया टेम्पल ॲक्ट १९४९ तातडीने रद्द करा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांच्या हाती सोपवा, अशी मागणी एकमुखी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, समता सैनिक दल, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, महिला सशक्तीकरण संघ, राष्ट्रीय बौद्ध महासभा यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांतर्फे अनागारिक धम्मपाल यांची जयंती संविधान चौकात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी कमलताई गवई होत्या. तर विचारपीठावर आकाश लामा, श्रामणेर विनयाचार्य, चंद्रबोधी पाटील, सुनील सारीपुत्त, प्रकाश दार्शनिक, भदत करूणाकर, भदंत धम्मशिखर, भदंत धम्मतप, भदंत श्रध्दामित्र, भदंत प्रियदशीं, भदंत नागदिपंकर, भंते धम्मरख्खित, गणवीर वानखेडे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कमलताई गवई यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात आपण सक्रीयपणे सहभागी राहू, असे आश्वासन दिले.श्रामणेर विनाचार्य यांनी आंदोलनातून एकता दाखविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांनी आपण सर्वांसोबत असल्याची ग्वाही दिली. आकाश लामा यांनी महाविहार मुक्तीचे आंदोलन आता शांत होणार नाही, असा शब्द देत या लढ्यात आपलाच विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व धर्माचे पवित्र स्थळ संबंधीत धर्माच्या ताब्यात आहे. महाबोधी महाविहार हे बौध्दांचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे सरकारने अस्तित्वात असलेला कायदा बदलावा. जुने कायदे बदलून बौध्दांच्या हक्काचा सन्मान केला जावा असे आवाहन करीत न्यायालयातही आपला हक्क व अधिकारासाठी बौध्द मागे हटणार नाही, असा इशारा दिला. प्रास्ताविक भदंत सुमीत पाल यांनी केले. संचालन भदंत चंद्रकितीं यांनी तर शंकर ढेंगरे यांनी आभार मानले.