लक्ष्मणरेखात दिसणार व्यंगचित्रांची जादू

By Admin | Updated: May 4, 2016 03:42 IST2016-05-04T03:42:43+5:302016-05-04T03:42:43+5:30

आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिनानिमित्त ‘लक्ष्मणरेखा’ नावाचा अनोखा व्यंगचित्र महोत्सव ४ मे पासून लोकमत भवन,

The magic of cartoons appearing in the Lakshman Rekha | लक्ष्मणरेखात दिसणार व्यंगचित्रांची जादू

लक्ष्मणरेखात दिसणार व्यंगचित्रांची जादू

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आजपासून आयोजन : व्यंगचित्राला प्रोत्साहन देण्यासाठी लोकमतचा पुढाकार
नागपूर : आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिनानिमित्त ‘लक्ष्मणरेखा’ नावाचा अनोखा व्यंगचित्र महोत्सव ४ मे पासून लोकमत भवन, जवाहरलाल नेहरू मार्ग येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आला आहे. व्यंगचित्रांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने हा पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांसाठी हा महोत्सव ८ मे पर्यंत चालणार आहे. या व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन ४ मे रोजी दुपारी १२ वाजता फाईन ललित कला विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र आणि लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन. के. नायक उपस्थित राहतील. याप्रसंगी विदर्भातील मान्यवर व्यंगचित्रकार त्यांचे व्यंगचित्र प्रदर्शित करतील. यावेळी काही घटनांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते टिप्पणीही करणार आहेत. यात विष्णुपंत अकुलवार, विजय काकडे, विजॉय बिस्वाल, संजय मोरे, उमेश चारोळे, गजानन वानखेडे, मंदार पार्डीकर आणि राहुल दहेकर यांचा समावेश आहे. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत लक्ष्मणरेखा व्यंगचित्र महोत्सव रोज दुपारी १२ वाजता सुरू होईल.
व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, आर. के लक्ष्मण यांच्यासारख्या महान व्यंगचित्रकारांनी महाराष्ट्राची शान संपूर्ण जगात वाढविली. लक्ष्मणरेखाच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांना त्यांची प्रतिभा जनतेसमोर सादर करण्याची एस संधी मिळणार आहे. या व्यंगचित्रकारांना पुरस्कारही प्रदान करण्यात येतील.
यात व्यावसायिक गटात ११ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, ७५०० रुपयांचा द्वितीय आणि पाच हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक हजार रुपयांचे तीन प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नवोदित व्यंगचित्रकारांसाठी पाच हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, चार हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि दोन हजार रुपयांचा तृतीय तसेच एक हजार रुपयांचे तीन प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
लक्ष्मणरेखा प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले आहे. व्यंगचित्रांवर प्रेम करणारे रसिक लोकमतच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत या सादरीकरणाचे साक्षीदार होऊ शकतात. लोकमत समूहाने या आयोजनाचा लाभ घेण्याची विनंती सर्व वाचकांना केली आहे. (प्रतिनिधी)

देशभरातील कार्टुनिस्ट होणार सहभागी
लक्ष्मणरेखाच्या उपक्रमात देशातील विविध वृत्तपत्रांच्या व्यंगचित्रकारांना त्यांचे व्यंगचित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील अनेक प्रख्यात व्यंगचित्रकारांनी या उपक्रमासाठी त्यांची व्यंगचित्रे पाठविली आहेत. रसिक दर्डा आर्ट गॅलरीत या व्यंगचित्रांचा आनंद घेऊ शकतात.

Web Title: The magic of cartoons appearing in the Lakshman Rekha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.