बाजारगाव : नागपूर-अमरावती मार्गावरील सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये स्फोट झाला असून त्यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्फोटात नेमकी किती हानी झाली आहे याची माहिती रात्री एक वाजेपर्यंत हाती आली नव्हती. मात्र, १५ जखमी कामगारांना घटनास्थळापासून २०० मीटरच्या परिसरातून बाहेर काढण्यात आले. त्यांना नागपूरकडे रवाना करण्यात आले.
अमरावती मार्गावर बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोजिव्हचे युनिट आहे. तेथे विविध स्फोटके, ग्रेनेइस, ड्रोन्स इत्यादींचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. प्राप्त माहितीनुसार १५ जखमींना तेथून बाहेर काढण्यात आले. ते सर्व लोक स्फोट झालेल्या इमारतीच्या २०० मीटर परिसरात असलेल्या लॅबमध्ये काम करत होते.
स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. कोंढाळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व आजूबाजूच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने सोलारकडे धाव घेतली.
सोबतच वरिष्ठांनादेखील याची माहिती कळविण्यात आली. रात्री दीड वाजताच्या सुमारास पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.नागपूर ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सोलारमधील इकॉनॉमिक युनिटमध्ये हा स्फोट झाला आहे. मात्र, या स्फोटात नेमके किती नुकसान झाले आहे याची सध्या कल्पना नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
महामार्गावर गर्दी, पोलिसांची धावपळ
दरम्यान, रात्री दीड वाजताच्या सुमारास सोलारसमोर आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी झाली होती. अनेक जण संतप्तदेखील झाले होते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची धावपळ झाली.
जखमी नागपूरकडे रवाना
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील सोलारकडे धाव घेतली. वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या गाडीने सहा जखमींना नागपूरकडे रवाना केले. त्यांना रविनगरातील दंदे इस्पितळात दाखल केले. वैद्यकीय पथकदेखील रवाना झाले.
महामार्गापर्यंत येऊन पडला मलबा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट इतका जबरदस्त होता की, थेट अमरावती महामार्गापर्यंत सिमेंटच्या काही विटा व मलबा येऊन पडला. याशिवाय बाजारगाव व आजूबाजूच्या गावांतील घरे हादरली. काही घरांच्या खिडकीच्या काचा तडकल्या व दरवाजाच्या कुंड्यादेखील तुटल्या. या बाजारगावनजीकच्या अनंततारा हॉटेलच्या काचादेखील फुटल्या आहेत.