म. गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते
By Admin | Updated: February 1, 2015 00:57 IST2015-02-01T00:57:18+5:302015-02-01T00:57:18+5:30
महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते.

म. गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींची पुण्यतिथी : प्रार्थनासभा आणि चर्चासत्र
नागपूर : महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते. त्यात काहीही गैर नाहीच पण यापलिकडेही गांधींजींचे व्यक्तिमत्त्व फारच समृद्ध होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच ते माहीत आहे. त्यावर फारसे लिहिले गेले नाही आणि त्याची चर्चाही झाली नाही. देशाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणारा हा नेता बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी होता. कलांवर प्रेम करणारे, रागसंगीताचे ज्ञान असणारे, अध्यात्माची ताकद असणारे आणि तरीही मिश्किल, विनोदी स्वभावाचे गांधीजी होते, अशी आठवण त्यांच्यासह प्रत्यक्ष काम केलेले स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय बरगी गुरुजी यांनी सांगितली.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गांधींजींच्या अनेक आठवणी बरगे गुरुजी यांनी सांगितल्या. गांधींजींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे नवे पैलू नव्या पिढीसाठी नवीन होते. त्यामुळे या कार्यक्रमात कुतूहल निर्माण झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्यूर मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक विलास शेंडे, कोळसा कामगार नेते माजी आ. एस. क्यू. जामा, सर्वोदयी विचारवंत प्राचार्य आत्माराम उखळकर, गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील उपस्थित होते. गांधीजी रोज प्रार्थनासभा घेत आणि त्यानंतर उपस्थितांशी चिंतनपर संवाद करीत. यातूनच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली.
एस. क्यू. जामा म्हणाले, महात्मा गांधी हे नाव नाही तर एक विचार आहे. त्यांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशासाठी लढाई केली. आज त्यांच्या विचाराची गरज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांचे विचार जगाला भुरळ घालत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला येतो. प्राचार्य आत्माराम उखळकर म्हणाले, गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज पुस्तकात या देशाच्या प्रगतीचा मार्ग लिहून ठेवला आहे. त्याच विचारांनी त्यांनी आयुष्यभर कार्य केले पण आपण त्यांच्या विचारांवर राज्य चालविले नाही. अन्यथा देशाचे आजचे चित्र वेगळे राहिले असते. औद्योगिकीकरणापूर्वी ग्रामीण भारताचा विकास साधण्याचे त्यांचे तंत्र होते. पंचवार्षिक योजना ग्रामीण विकासासाठी राबविल्या असत्या तर शेतकरी आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला असता. त्यानंतर उद्योग उभारणी करता आली असती. पण औद्योगिक धोरण राबविल्याने आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. विलास शेंडे यांनी प्रार्थना आणि बंधूता या विषयावर मत व्यक्त करताना गांधीजींच्या प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. ते सर्वच धर्मांच्या प्रार्थना करीत होते. प्रार्थनेतून बंधूता आपोआप निर्माण होते, असे ते म्हणाले. सर्वोदयी विचारवंत देशपांडे गुरुजी यांनी सर्वधर्म प्रार्थना विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. गांधीजींच्या प्रार्थनासभेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. त्यांच्या प्रार्थनासभेत सर्व धर्मांचे लोक सहभागी होत होते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन गांधी विचार प्रसारक रवी गुडधे यांनी केले. (प्रतिनिधी)